Sun, Nov 18, 2018 02:59होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर अनोखी शिवजयंती

अजिंक्यतार्‍यावर अनोखी शिवजयंती

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:17PMसातारा : प्रतिनिधी

दलित महिला विकास महामंडळाच्यावतीने स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा  विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी   दिंडी दरवाजापासून छत्रपती  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात  आली. दरम्यान, राज्यातील गडकोट संवर्धनासह विविध ठराव यानिमित्त आयोजित कार्यक्रमात  पारित करण्यात आले.

छ. शिवाजी महाराज हे कुशल योध्दे होते, म्हणूनच त्यांचे गडकोट अद्ययावत असले पाहिजेत. ऐतिहासिक ठेवा म्हणून हे गडकोट मराठी साम्राज्याची अस्मिता आहे. म्हणूनच गडकोट संवर्धनासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याला व्यापकता मिळावी यासाठी शिवजन्मोत्सव सोहळ्यात ठराव पारित करण्यात आले. दलित महिला विकास महामंडळाच्यावतीने अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा झाला.

सायंकाळी अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारातून पालखी सोहळ्यास वाजत गाजत प्रारंभ झाला. ‘छ. शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा जयघोषात पालखी राजसदरेवर पोहचली. त्यानंतर शिववंदना होऊन मुजरा करण्यात आला. शाहीर अमर शेख यांनी पोवाडा सादर केला तर कॉम्रेड  गोविंदराव पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकातील उतार्‍याचे सामूहिक वाचन करण्यात आले. गडकोट संर्वधन, ऐतिहासिक पर्यटनस्थळे विकसित करावीत आणि अफझलखान कबरीवरील अवैध बांधकाम हटवण्यात यावे असे तीन ठराव यावेळी पारित करण्यात आले. अझफलखान कबरीवरील अवैध बांधकाम शिवसंशोधन केंद्र म्हणून विकसित करून त्याबाबत न्यायालयीन वाद संपवावा. या ठरावांचा पाठपुरवा करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. 

यावेळी अ‍ॅड. वर्षा देशपांडे, डॉ. संजय भोंडे, डॉ. शैलजा ठोके, प्रा. निकम, अ‍ॅड. शैला जाधव, मिनाज सय्यद, अमोय साठे, माया जाधव यांच्यासह दलित विकास महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.