Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Satara › समोरासमोर आलो होतो मग ‘सुरुचि’तून पळून का गेला? : शिवेंद्रराजे 

समोरासमोर आलो होतो मग ‘सुरुचि’तून पळून का गेला? : शिवेंद्रराजे 

Published On: Jun 17 2018 1:38AM | Last Updated: Jun 16 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचार सुरु  आहे हे सांगायला खा. उदयनराजेंच्या आघाडीतील नगरसेविकेचे पत्रच पुरेसे आहे. 700 कोटींची कामे सुरु असती तर सातार्‍याचा सिंगापूरपेक्षा जास्त विकास व्हायला हवा होता.  कामे दिसत नसल्यामुळे हा निधी कुठे गेला? याच्या चौकशीसाठी आम्ही पोलिसांत एफआयआर दाखल करणार आहोत. खासदार सर्वांनाच  बघतो, दाखवतो असे म्हणतात. आम्हाला गांधी मैदानावर  समोरासमोर बोलवता, पण आमच्या ‘सुरुचि’त आल्यावर तुम्ही पळून का गेला? असे आव्हान आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांना दिले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका किती भ्रष्ट आहेेत याचे उदाहरण मी दिलेच आहे. या नगरसेविकेने स्वतंत्र लेटरहेडवर मुख्याधिकार्‍यांना लिहून दिले की मी व माझ्या नवर्‍याचे पटत नाही. नगरपालिकेत ते ठेके घेतात की काय करतात मला माहित नाही. आमचे संबंध नाहीत असे पत्र दिले. भ्रष्टाचाराचे यापेक्षा वेगळे उदाहरण काय असू शकते. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अ‍ॅड. बनकर सांगतात त्यानुसार 4 हजार झाडे कुठे लावण्यात आली. अजिंक्यतारा किल्ल्यावरील झाडांनाही नगरपालिकेने बिल्ले मारले का? समोरासमोर गांधी मैदानावर बोलवता, मग ‘सुरुचि’त आला होता तर का पळून गेला? तुम्हीही समोर होता मीही समोर होतो. मग काय केले?  गांधी मैदानावर समोरासमोर येवून तिथे काय कुस्ती खेळायचीय का दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांना बोलावून खो-खो खेळायचाय?  

आ. शिवेंद्रराजे म्हणाले,  सोलापूर जिल्ह्यातील अकलूूजचे त्यांचे सहकारी अशोक सावंत यांचे सातार्‍यावर एवढे प्रेम का? हे त्यांना विचारा. टोलनाके अशोक सावंतच चालवतात. कास तलाव उंची वाढवण्याच्या कामाचे टेंडर बीडच्या ठेकेदाराने घेतले होते. त्याच्यावर दबाव टाकून अशोक सावंतच्या कंपनीला ते टेंडर ‘सबलेट’ केले. कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामात दुसरा कुणी ठेकेदार का नाही? या कामातून खासदारांना ‘माल’ दिला जात आहे का? दबाव टाकून टेंडर मिळवून कामे केली जात आहेत. स्वच्छता ठेक्यात पूर्वीही कॉम्पॅक्टर, टिपर, डंपरचा वापर केला जाता होता. या वाहनांसह घंटागाड्यांवर होणारा खर्च महिन्याला 5 लाख होता. आता हा खर्च 18 लाखांवर गेला हे सत्य आहे. पुण्याची साशा कंपनी ठेकेदार म्हणून आल्यावर हा खर्च कसा काय वाढतो? नगरपालिकेत केलेली ही लूट कुणापर्यंत जाते? गोळा केलेले वरचे पैसे कुणाला पोहोच केले जातात? अशोक सावंत तडजोडी करुन नेत्यापर्यंत माल पोहोच करतात ही उघड चर्चा आहे, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. 

अजिंक्य समुहातील कोणत्याही संस्था तोट्यात नाही. अजिंक्य बँक विलिन झाली असली तरी सर्व खातेदारांची देणी, ठेवी त्यांना परत केल्या. ठेवीदारांचा रुपयाही बुडवला नाही. मात्र, याचवेळी उदयनराजेंनी राजकीय डाव खेळला. महिला बँकेचे विलिनीकरण होवू नये म्हणून त्यांनी संबंधितांवर दबाव आणला. स्वत:चे राजकारण टिकवून माझ्यावर दबाव रहावा म्हणून त्यांनी संबंधितांना फोन करुन शिवीगाळ करत दमदाटीचे तंत्र वापरले, असा गौप्य स्फोटही आ. शिवेंद्रराजे यांनी केला. दहशत आणि मारामारीबद्दल उदयनराजेंनी बोलू नये. ते संयुक्तिक वाटत नाही. मी कुणाला मारले असेल तर

पोलिस माझ्यावर कारवाई करतील. ज्यांच्याबद्दल बलात्काराची तक्रार होती त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना हक्क रहात नाही.बाबा कल्याणींच्या जागेवरील टाऊन हॉलचे आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव यांनी शासनाला पाठवला. तो नामंजूर झाला. त्यानंतर आता त्या जागेवर नगरपालिका इमारत बांधून उर्वरित जागा कल्याणींना देण्यात येणार आहे.  कशाला पाहिजे त्यांना त्याठिकाणी इमारत? त्याठिकाणी त्या भागातील लोकांसाठी आहे त्या आरक्षणावर टाऊन हॉल व नाट्यगृह बांधा. त्या परिसरातील लोकांची सोय होईल. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभागृह नेते अमोल मोहिते, हेमंत कासार, राजू भोसले, अविनाश कदम, शेखर मोरे,  फिरोज पठाण, शकील बागवान, प्रविण पाटील, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, मनीषा काळोखे आदि उपस्थित होते.