Mon, May 20, 2019 10:49होमपेज › Satara › आ. शिवेंद्रराजेंचे राजकीय दबावतंत्र

आ. शिवेंद्रराजेंचे राजकीय दबावतंत्र

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:53PMकुडाळ : प्रतिनिधी  

निवडणुका अद्यापही दूर असल्या तरी सातार्‍यातील राजकीय वातावरण मात्र आत्तापासूनच तापू लागले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या मतदार संघातील कार्यक्रमाला  भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनाच निमंत्रण दिल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. आ. शिवेंद्रराजेंनी आपल्या खेळीने राष्ट्रवादीवरही दबाव वाढवला आहे. 

आ. शिवेंद्रराजे भोसले हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. सोमवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधून  प्रतिपंढरपूर करहर (ता. जावली) येथील  कार्यक्रमाला  आ. शिवेंद्रराजे भोसले व भाजप नेते पुरूषोत्तम जाधव एकत्र आल्याने सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बराचवेळ खलबते केली. दोघांच्या एकत्र येण्याने सातारच्या राजकारणाला  वेगवेगळे संदर्भ दिले जात आहेत. पुरूषोत्तम जाधव हे भाजपाचे नेते  आहेत. त्याचवेळी ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत.खा. उदयनराजेंच्या विरोधात त्यांनी लक्षणीय मते घेतली आहेत. उदयनराजेंच्या राजकीय विरोधकालाच आपल्या मतदार संघातील कार्यक्रमाचे निमंत्रण आ. शिवेंद्रराजेंनी  दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गलबला झाला. या घटनेची राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात जोरदार चर्चा झडली आहे. 

करहरमधील कार्यक्रमात सोमवारी आ.शिवेंद्रराजे भोसले व पुरूषोत्तम जाधव एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मुळात शिवेंद्रराजेंनीच त्यांना निमंत्रण देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.   त्यानुसार हे दोघे एकत्र आले. यावेळी त्यांनी हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे सांगितले असले तरी त्याला आगामी काळातील राजकीय वाटचालीचे कंगोरे पहायला मिळत आहेत. आ. शिवेंद्रराजे यांनी आपण स्वत:च पुरूषोत्तम जाधव यांना निमंत्रित केल्याचे सांगितल्यानंतर जाधव यांनीही आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्‍त केल्या. ते म्हणाले, येथे आल्याने मला प्रचंड उर्जा मिळाली आहे. मी दोन वेळा लोकसभा व विधानसभा लढलो आहे. विजयश्री मिळाली नसली तरी मी वारकरी व शेतकर्‍याचा मुलगा आहे. सर्वसामान्यांची लढाई लढत आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्यासोबत मी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. 

या दोन्ही नेत्यांच्या या भेटीने सातारा, जावलीसह जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.  मनोमीलन फिस्कटल्यानंतर आ. शिवेंद्रराजे व खा.उदयनराजे भोसले यांच्यात दरी निर्माण झाली आहे. आता यावेळेस सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे पुन्हा इच्छुक आहेत.  असे असले तरी त्यांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यातून इच्छुक असलेले व सध्या लोकसभेची तयारी करत असलेले भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांना आ. शिवेंद्रराजेंकडून ताकद मिळू लागली आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणे पहायला मिळण्याची चिन्हे  आहेत.

दोन्ही राजांच्या वादाने जिल्ह्यात आता राजकीय डावपेचांनाही उधाण येवू लागले आहे. याच पार्श्‍वभूमीवर भाजपा नेते पुरुषोत्तम जाधव व आ.शिवेंद्रराजे भोसले याची भेट जाणीवपूर्वक घडवून आणल्याने आगामी काळातील राजकीय समीकरणे नाट्यमय कलाटणी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.