Sun, May 26, 2019 19:06होमपेज › Satara › मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे आक्रमक

मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे आक्रमक

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:50PMसातारा : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासूनच आग्रही आणि आक्रमक राहिलेल्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी नागपूर येथील अधिवेशनात चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांनी पोटतिडकीने भावना व्यक्‍त केल्या. समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. अजित पवार यांच्यासोबत आ. शिवेंद्रराजे यांनी गुरुवारी सभागृहात केली. 

कोपर्डी घटनेनंतर तमाम मराठा समाज एकवटला आणि राज्यभरात मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात आले. सातार्‍यात झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात आ. शिवेंद्रराजे यांनी सक्रीय सहभाग घेवून मराठा समाजाचे आरक्षण आणि विविध मागण्या मान्य होण्यासाठी वाट्टेल ते करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कोपर्डीत झालेला मराठा मूक मोर्चा आणि त्यानंतर सातार्‍यात झालेला कॅन्डल मार्च यामध्येही आ. शिवेंद्रराजे मराठा समाजाचा एक घटक म्हणून सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या न्याय हक्‍कासाठी सुरु असलेल्या या लढ्यात नेहमीच सक्रीय राहणार असल्याचे जाहीर करुन दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातही आ. शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले होते. 

मराठा समाजावर होणार्‍या अन्यायाविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लढा उभा राहिला. संपूर्ण मराठा समाज अन्यायाविरोधात पेटून उठला. सातार्‍यात हा लढा तीव्र होण्यासाठी, मोर्चा, कॅण्डल मार्च आदी आंदोलने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनी प्रत्येक बैठकीला हजेरी लावली होती. तसेच सर्व आंदोलनासाठी आयोजकांना सर्व प्रकारचे सहकार्य करुन मोर्चा आणि कॅण्डल मार्च यशस्वी करण्यासाठी योगदान दिले होते. नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार का? याकडे तमाम मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले होते. सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा सुरु झाली मात्र सरकार आरक्षणाबाबत उदासीन असल्याचे दिसताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, आ. अजित पवार आणि आ. शिवेंद्रराजे भोसले हे तिघे आक्रमक झाले आणि त्यांनी सभापतींच्यासमोर येवून जोरदार आक्षेप नोंदवला. आ. शिवेंद्रराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी रोखठोख भूमिका घेतली. सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक निर्णय घेवून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी या तिघांनी केली. यामुळे सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्यावर नमते घ्यावे लागले.