Wed, Feb 20, 2019 06:45होमपेज › Satara › पक्षीमित्र शिवम पवारने पक्षांना दिला निवारा 

पक्षांसाठी त्याने बांधले घरात घरटे 

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 8:52PMरेठरे बु॥ : दिलीप धर्मे 

रानावनात,घराच्या अंगणात झाडावर, कानी पडणारा पक्षांचा मंजुळ आवाज आज शोधावा लागत आहे. अशा वेळी पक्षीप्रेमी युवकाने आपल्या राहात्या घरात पक्षांसाठी घरटे बांधुन पक्षांना निवारा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे योगदान बदलत्या जमान्यातही पक्षी आणि माणुसकीचे नाते घट्ट करणारे आहे. मुक्या प्राण्याबद्दल युवकाने केलेल्या कर्तृव्याने अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येत आहे.  

गोंदी ता. कराड येथील शिवम लालासो पवार असे या पक्षी मित्राचे नाव आहे. त्याने आपल्या राहात्या घरात पक्षांसाठी एक लोखंडी पिंजरा तयार केला आहे. यामध्ये तीन ते चार जातींचे साधारण 8 ते 10 पक्षांचे वास्तव आहे.दिवसातून रोज तीन ते चार वेळा या पक्षी, पाखरांना खाऊ घालण्याचे काम शिवम न चुकता करत असतो. पक्षीही ठरलेल्या वेळेला त्याची वाट पाहात असतात. रेठरे  येथील इंग्लिश मिडीयममध्ये शिकणार्‍या शिवमला पक्षी, प्राणी तसेच पाखरांविषयी विशेष आवड आहे. त्याने आपल्या मुंबई येथील आत्यांकडून याचे मार्गदर्शन व बारकावे शिकून घेतले आहे. आजच्या युगात तो करत असलेल्या कार्याची गरज असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुकच्या आधुनिक युगामुळे घराघरातील संवाद दुरावत चालले आहेत. नात्यांमधील आस्था हरवत चालली असताना मात्र पक्षांबद्दलच्या अतीव प्रेमाने शिवमने स्वत:च्या घरातच त्यांचे घरटे बांधून पक्षांप्रती असणारी प्राणीदया जपलेली आहे. केवळ दुसर्‍याला उपदेश करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतूनच संदेश देणार्‍या शिवमचे कौतुक होत आहे.