Mon, May 20, 2019 19:01होमपेज › Satara › शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला खावलीत जागा

शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला खावलीत जागा

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 11:48PMसातारा : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातार्‍यापासून जवळच असणार्‍या खावली येथे होणार आहे. हे उपकेंद्र सुरु झाल्यास जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सहा महिन्यांत या उपकेंद्राचे काम सुरु केले जाणार आहे. उपकेंद्र सुरु झाल्यानंतर सोलापूर विद्यापीठाप्रमाणे सातार्‍यात स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केले जाणार असल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या दालनात खा. उदयनराजे भोसले तसेच कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी संयुक्त बैठक झाली. यावेळी  डॉ. डी. डी.  शिर्के, रजिस्ट्रार डॉ. विलास नांदवडेकर, अ‍ॅकॅडमिक अ‍ॅडव्हायझर डॉ. डी. आर. मोरे, सिनेट सदस्य अ‍ॅड डी. जी. बनकर, अमित कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जि. प.चे माजी सभापती सुनील काटकर, अमित कदम, मनोज शेंडे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेत खावलीतील जागा निश्‍चित करण्यात आली. ही जागा उपलब्ध करुन देण्यात कोणतीही समस्या नसल्याने खा. उदयनराजे भोसले यांच्या सुचनेनुसार ही जागा  उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  उपकेंद्रासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या केंद्राशी असलेले अडथळे खा. उदयनराजेंनी बैठकीतच सोडवले. 

दरम्यान, मान्यवरांनी संबंधित जागेची पाहणी केली. त्यानंतर खा. उदयनराजे म्हणाले, सातार्‍यात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी पहिल्यापासून आग्रही होतो.  अ‍ॅड. डी. जी. बनकर आणि अमित कुलकर्णी यांना केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी शिवाजी विद्यापीठातील संबंधित विभागांकडे, अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला.  कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह विद्यापीठ अधिकार्‍यांनी  त्यांना सहकार्य केले.  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यापीठाशी  संबंध येत असतो. विद्यापीठाशी संपर्क साधत असताना विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येत असतात. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठ केंद्र सुरु करण्याचा प्रयास आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्‍न संपुष्टात आला आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात उपकेंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. हे केंद्र सुरु झाल्यानंतर सोलापूर विद्यापीठासारखे सातारा विद्यापीठ स्वतंत्रपणे निर्माण केले जाईल, असेही खा. उदयनराजेंनी स्पष्ट केले.