Sun, Jun 16, 2019 02:57होमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर ५१ दिवस होते शिवरायांचे वास्तव्य

अजिंक्यतार्‍यावर ५१ दिवस होते शिवरायांचे वास्तव्य

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:09PMसातारा : सुशांत पाटील 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानी सातार्‍याशी अतूट असे नाते आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला घडलेल्या  प्रतापगडावरील अफझलखानाचा वध या घटनेकडे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात रोमाचंक क्षण म्हणूण पाहिले जाते. त्यानंतर इ.स 1676 मध्ये शिवराय आजारपणामुळे सातार्‍यात आले होते. यावेळी ते अजिंक्यतारा किल्ल्यावर तब्बल  51 दिवस राहिले होते.  रायगडावर असताना छत्रपती शिवराय आजारी पडले होते.

कैक प्रयत्नानंतर राजवैद्यांनी हवामान बदलासाठी शिवरायांना सातारला जाण्याचा सल्ला दिला. सातारचे हवामान चांगले असल्यामुळे शिवराय अजिंक्यतारा किल्ल्यावर 51 दिवस राहिले. त्यावेळी अजिंक्यतार्‍याला मंगळाईचा डोंगर म्हणून ओळखले जायचे. छत्रपती शिवाजी महाराज 51 दिवस सातार्‍यात राहिल्याचा पुरावा म्हणजे पाली गावातील दोन पाटलांचा ‘पाटीलकी’ संदर्भात असलेला वाद होय. खंडोजी मालोजी खराडे, कान्होजी खराडे, मलजी खराडे आणि नरसोजी खराडे हे चार अग्रवादी आणि पाली येथील पाटील नागोजी बाबाजी कालभार (काळभोर), मल्हारजी विजोजी कालभार (काळभोर), विजोजी संभाजी गोरे, दावलजी बोपाजी कालभार (काळभोर) व पाटील आणि चौगुला मल्हारजी सूर्याजी कालभार (काळभोर) हे पाच प्रतिवादी, यांच्यामध्ये पाली गावच्या पाटीलकीबाबत गरगशा (वादविवाद) लागला.

याबाबतची तक्रार थेट छत्रपती शिवरायांकडे गेली. हा ‘महजर’ 1 फेब्रुवारी 1676 साली झाला. कराड तालुक्यातील खंडोबाची पाली येथे झालेल्या ‘महजर’वर शिवरायांच्या साक्षीने तोडगा निघाला. त्यावेळी झालेल्या ‘महजर’वर शिवाजी महाराज यांची स्वाक्षरी आहे. या महजरचा कागद पत्रिकेसारखा मोठा आहे. शिवाजी महाराज यांची सही असलेला हा मूळ महजर आजही पालीमध्ये उपलब्ध आहे. या घटनेच्या अगोदर शिवाजी महाराज अफझलखान वधाच्या वेळी सातार्‍यात आले होते. अफझलखान वधानंतर त्यांनी सातार्‍यातील प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. मराठा राज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातार्‍यात सन 1839 पर्यंत शिवछत्रपतींच्या उत्तराधिकार्‍यांनी राज्य केले आहे. त्यामुळेच आजही येथील ऐतिहासिक स्थळे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.