Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Satara › खटावकरांनी अनुभवला शिवकालीन शस्त्रांचा थरार

खटावकरांनी अनुभवला शिवकालीन शस्त्रांचा थरार

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 8:48PMखटाव : प्रतिनिधी 

खटाव शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या  शिवकालीन शस्त्र  प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विविध शस्त्रांचा थरार खटावकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.

खटावच्या  शिवजयंती उत्सवाचा  शस्त्रप्रदर्शनाने मोठ्या दिमाखात प्रारंभ करण्यात आला. सरपंच सुवर्णा पवार आणि सपोनि संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. 

शालेय विद्यार्थी आणि खटावकरांना महाराष्ट्राच्या  गौरवशाली इतिहासाविषयी माहिती व अमुल्य मार्गदर्शनाचा लाभ व्हावा व  या दुर्मीळ वस्तू प्रत्यक्ष पाहता याव्यात, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. त्यांनी वैविध्यपूर्ण शस्त्रांच्या माध्यमातून पराक्रमी शिवकाळ उलगडून दाखविला. शस्त्रास्त्रांच्या बरोबरच त्या काळातील रोचक माहिती खटावकरांनी जाणून घेतली. 

शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व मावळ्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले शस्त्रप्रदर्शन कमालीचे यशस्वी ठरले.

तोफेची चाके आणि पट्टा तलवारी...

शिवकालीन तोफेची चाके, विविध प्रकारचे दांडपट्टे, धोप, चंद्रकोर आणि पट्टा तलवारी, लाकडी विरघळ, रायगडावरील तोफगोळ्यांचे तुकडे, खंजीर, शिवकालीन नाणी, छायाचित्रे, ढाली आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाले अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि  मराठ्यांची  शौर्यगाथा सांगणारी अनेक शस्त्रे प्रदर्शनात मांडण्यात  आली होती.