Tue, Jun 02, 2020 00:37
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › शिवसेनेतील उपद्रवींचा उद्धव लवकरच करणार बंदोबस्त!

शिवसेनेतील उपद्रवींचा उद्धव लवकरच करणार बंदोबस्त!

Published On: Jul 25 2019 1:51AM | Last Updated: Jul 24 2019 8:21PM
सोलापूर : प्रतिनिधी
गतवेळच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही शहर मध्य मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  महेश कोठे यांना डोकेदुखी ठरणार्‍या पक्षातीलच उपद्रवींचा बंदोबस्त आपण स्वतः करू, असा शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिला असल्याची माहिती कोठे यांनी दिली आहे. त्यामुळे कोठे हे आगामी निवडणुकीत वंचित आघाडीप्रमाणेच विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ठाकरे शहरातील कोणत्या नेत्यांचा बंदोबस्त करणार, हे पाहणे नजीकच्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. 

भाजप-शिवसेना युती होणार की नाही, जिल्ह्यातील 11 विधानसभा जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला किती व कोणत्या जागा येणार अशा चर्चा सध्या शहरात रंगत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, पक्षातंर्गत मतभेदांमुळे अनेकांना  उमेदवारी मिळण्यात अडचणी आहेत. जिल्ह्यातील 11 जागांपैकी सात जागांवर सेनेचा दावा आहे. त्यामुळे इतर पक्षांतील इच्छुकांचा ओढा सेनेकडे राहील.  दोन्ही काँग्रेसमधील अनेकजण सध्या कोणत्या पक्षाकडे कोणता मतदारसंघ आहे आणि कोणत्या पक्षात गेल्यास आपला मतदारसंघ सुरक्षित राहील याचा अभ्यास करीत आहेत.

काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले व धुरंधर राजकारणी राहिलेले वडील स्व. विष्णुपंततात्या कोठे यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या महेश कोठे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु करत काँग्रेसचा पराभव करून आमदार होण्याचा चंग बांधला आहे. यासाठी कोठेंनी शहर मध्य मतदारसंघातील बूथ यंत्रणा आणि शिवसेनेच्या किमान दीडशे शाखा प्रारंभाचा श्रीगणेशा केला आहे.
महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून कोठेंविरुद्ध मूळ शिवसेना पदाधिकारी यांच्यातील मतभेद दिसून आले होते. परंतु, काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर महापालिका निवडणुकीत सेनेचे आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल 21 नगरसेवक निवडून आणणार्‍या कोठेंचा करिश्मा थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. गतवेळी शहर विधानसभा मतदारसंघात युती नसतानाही कोठेंनी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली होती. 

भाजप-शिवसेना युती झाली तर शहर मध्य आणि युती झाली नाही तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी कोठे करत आहेत. याबाबत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी  चर्चा करून आपल्या वाटेत काही आपलेच अडथळा आणतील, अशी शंका उपस्थित केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी सेनेतील उपद्रवींचा बंदोबस्त करतो असे आश्‍वासन दिले आहे, असे कोठे यांनी सांगितले. कोठेंना शिवसेनेतील उपद्रवी कोण आणि उद्धव ठाकरे त्यांचा बंदोबस्त काय करणार, याबाबत शिवसैनिकांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने पक्षांर्गत वादापासून शिवसेनादेखील सुटलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

थेट ठाकरेंकडून आश्‍वासन मिळाल्याने निश्‍चिंत

आगामी विधानसभा निवडणूक आपण शिवसेनेकडूनच लढविणार आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास शहर मध्य आणि युती न झाल्यास शहर उत्तर मतदारसंघासाठी आपली तयारी आहे. शिवसेनेतील उपद्रवींबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे बोललो असून उपद्रवींचा बंदोबस्त करतो, असे आश्‍वासन थेट उद्धवसाहेबांनीच दिले असल्याने आपण निश्‍चिंत आहोत, असे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले.