Tue, Nov 20, 2018 21:06



होमपेज › Satara › शिवप्रतापदिनी अवतरला शिवकाल

शिवप्रतापदिनी अवतरला शिवकाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





महाबळेश्‍वर : वार्ताहर

ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुतार्‍यांचा आवाज, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक, अशा अलोट उत्साहात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच या मंगलमय वातावरणात हजेरी लावलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, त्यांचे पती सांगली जिल्ह्याचे आयकर विभागाचे  सहायक आयुक्‍त पूर्णेश गुरुरानी,  पोलिस अधीक्षक  संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्‍तिमय वातावरणात आई भवानीमातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोड्शोपचारे पूजा बांधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

शिवशाहीचे प्रतीक असणार्‍या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुतार्‍या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. 

यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अविनाश शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, सभापती रुपाली राजपूरे, तहसिलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी दिलीप शिंदे,  मुख्याधिकारी अमिता दगडे  व मान्यवर उपस्थित होते.

मानाच्या पालखीची पूजा झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. प्रशासनाच्या सर्व अधिकार्‍यांनी ही पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुतार्‍या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्‍या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.

पालखीचे शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आली. यावेळी ‘क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने,  शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकार्‍यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले. यानंतर सातारा पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर शाहीर संभाजी जाधव आणि सहकार्‍यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.

लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुर्‍हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा या ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.