Wed, May 22, 2019 10:47होमपेज › Satara › शिवघोषाने किल्‍ले प्रतापगड दुमदुमला 

शिवघोषाने किल्‍ले प्रतापगड दुमदुमला 

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:20PMसातारा : प्रतिनिधी

‘जय भवानी, जय शिवाजी,  छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा विविध घोषणांचा जयजयकार, ढोल लेझीमचा गजर, पावलो पावली रेखाटलेल्या लक्षवेधक रांगोळ्यांच्या पायघड्या अशा दिमाखदार सोहळ्यात  किल्‍ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी झाली. जिल्हा परिषदेच्यावतीने यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवजयंतीमुळे किल्‍ले प्रतापगडावरील वातावरण भारावून गेले होते. बघावे तिकडे भगव्या पताका, भगवे झेंडे व छत्रपती शिवरायांचा जयजयकार अशा मंतरलेल्या वातावरणाने शिवपराक्रमाला पुन्हा एकदा उजाळा दिला. गडावरुन शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमींची तोबा गर्दी झाली होती.  सकाळी जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते गडावरील भवानी मातेची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी  शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, कृषि सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती सौ. वनिता गोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  पी. बी. पाटील, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.  

भवानी माता मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करून ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. प्रतापगड परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयातील   ढोल ताशा व लेझीम पथकांच्या गजरात पालखीची वाजत-गाजत मिरवणूक निघाल्यानंतर ठिकठिकाणी नागरिक व शिवभक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पदाधिकारी व अधिकार्‍यांनी खांद्यावरून पालखी वाहिली. 

‘जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय’ अशा आई भवानी मातेचा व छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणार्‍या  घोषणांनी प्रतापगड परिसर दुमदूमून गेला. पारंपारिक वेशभूषेत फेटेधारी युवक-युवतींच्या सहभागामुळे शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण झाला. पालखी मिरवणूक शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याजवळ आल्यानंतर तेथे जि.प. प्रशासनाच्यावतीने ध्वजपूजन करून  ध्वज फडकवण्यात आला. यावेळी पदाधिकार्‍यांच्यावतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य  व अधिकारी, कर्मचारी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर  भवानीमाता मंदिरापासून   शिवपुतळ्यापर्यंत आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. शिवपुतळा परिसरात आकर्षक फुलांची केलेली सजावट शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले बांबूचे काठी नृत्य व संचलन शिवजंयती सोहळ्याचे आकर्षण ठरले. शाहीर रुपचंद चव्हाण व कलाकारांनी  पोवाडा सादर करून इतिहासाला उजाळा दिला. सातारा, पुणे, रायगड अन्य जिल्ह्यातील शिवप्रेमींनी शिवज्योत  नेण्यासाठी गर्दी केली होती. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने प्रतापगडावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच पदाधिकार्‍यांनी शाळांना रोख स्वरूपात बक्षिसे दिली. यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर  महाआरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, महाबळेश्‍वर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाची आचारसंहिता असल्याने जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभा यावेळी झाल्या नाहीत.