Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Satara › शिंगणापूर पाणीयोजना मोजतेय अखेरची घटका

शिंगणापूर पाणीयोजना मोजतेय अखेरची घटका

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:15PMशिखर शिंगणापूर : वार्ताहर

सुरवातीपासूनच थकबाकीच्या ग्रहणात अडकलेल्या शिंगणापूर  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची महावितरण व पाटबंधारे विभागाची सुमारे दोन कोटी थकबाकी असल्याने चार वर्षांपासून ही योजना ठप्प आहे. दुष्काळी भागातील जनतेसाठी सुमारे 18 कोटी खर्चून सुरू केेलेली शिंगणापूर पाणीयोजना सध्या अखेरची घटका मोजत आहे.  शिखर शिंगणापूरसह माण उत्तर भागातील 11 गावांसाठी 1995 मध्ये मंजूर केलेली शिंगणापूर  प्रादेशिक पाणीपुरवठा 2003 पासून प्रत्यक्षात सुरू झाली.

या योजनेसाठी  18 कोटी खर्च  करून धर्मपुरी, ता. माळशिरस येथून नीरा उजवा कालव्यातून पाणी उचलून ते कारुंडे येथील पाणीसाठवण तलावातून शिंगणापूर जलशुद्धीकरण केंद्रात आणले आहे. शिंगणापूरमधून मोही, मार्डी, खुंटबाव, पर्यंती, कारखेल, पळशी, राणंद, वावरहिरे, डंगीरेवाडी या गावांना पाणी पुरविले जाते. यासाठी धर्मपुरी येथे 110 तर कारुंडे येथे 275 अश्‍वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंपासाठी सोलापूर तर शिंगणापूरच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी सातारा महावितरणने वीजपुरवठा केला आहे.

मात्र, 2003 पासून अनेकदा थकीत विजबिलापोटी वीजपुरवठा खंडीत केल्यानेयोजना ठप्प झाली आहे. सध्या सातारा व सोलापूर विभागाची 1 कोटी 78 लाख 28 हजार व पाटबंधारे विभागाची 11 लाख अशी एकूण 1 कोटी  89 लाख 28 हजार थकबाकी असल्याने योजना  4 वर्षांपासून ठप्प आहे. वसुलीसाठी सातारा व सोलापूर महावितरणने न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान योजना बंद असल्याने विजपंप, विजतारा या साहित्याची मोडतोड व चोरी झाली आहे.

कोट्यवधींचे वीजबिल भरण्यासाठी योजनेत समाविष्ट गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेयोजना चार वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहे. दरवर्षी शिंगणापूर यात्रानियोजन बैठकीत पाणीयोजनेबाबत चर्चा होते मात्र थकबाकीचा फुगवटा ऐकून ठोस उपाययोजना करणे शक्य होत नाही. सध्या थकबाकीमुळे शिंगणापूर पाणीयोजना सुरू करण्याचे  आव्हान असून शासनाचे 18 कोटी पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पर्यायी योजनेची मागणी

सध्या धोम- बलकवडी कालव्याचे पाणी शिंगणापूर नजिकच्या कोथळे गावातून जात आहे. हे पाणी मुंगीघाट माथ्यावर आणून पुष्कर तलावात सोडल्यास शिंगणापूरसह अनेक गावांचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे. याशिवाय मुंगीघाट डोंगरमाथ्यावर सौरऊर्जा अथवा पवनऊर्जा प्रकल्प उभारणी केल्यास योजनेला वीजपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. याचा गांभिर्याने विचार केल्यास शिंगणापूरसह दुष्काळी जनतेची  ससेहोलपट थांबणार आहे.
 

 

tags : Shinganapur,news,Shinganapur, Water, plant,off ,