Tue, Jun 02, 2020 01:04
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › शिंदेंनी घातली ‘टोपी’... राजेंनी दिला नारळ

शिंदेंनी घातली ‘टोपी’... राजेंनी दिला नारळ

Last Updated: Dec 11 2019 11:16PM
सातारा : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शशिकांत शिंदे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध थांबायला तयार नाही. आपल्या परभवाला जवळचे मित्र जबाबदार असल्याचा शशिकांत शिंदे यांनी केलेला आरोप आ. शिवेंद्रराजेंनी पुराव्यासह खोडून काढताना हुमगावमध्ये मी मायनस कसा? असा उलटा प्रहार केला. याच दिवशी एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोघे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर एकत्र आले. मानपान देण्याच्या स्टेजवर शिंदेंनी शिवेंद्रराजेंना टोपी घातली तर राजेंनी त्यांना नारळ दिला. मात्र, पूर्वीसारखा ओलावा या भेटीत दिसला नाही.

विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. शिंदे त्यांच्या पद्धतीने या पराभवाचे विश्‍लेषण करत आहेत. उदयनराजेंचे थेट नाव घेऊन व शिवेंद्रराजेंचे नाव न घेता त्यांच्यावर आक्षेप ठेवताना दिसत आहे. कुडाळ जि. प. गटाच्या पोटनिवडणुकीत याबाबतची तीव्रता अधिक गडद झाली.  त्यातच शशिकांत शिंदे यांनी संघर्षाची भूमिका जाहीर केली. त्यांचा रोख उदयनराजे व शिवेंद्रराजेयांच्या दिशेनेच होता. त्याला शिवेंद्रराजेंनी लागलीच उत्तर दिले. सोक्षमोक्ष कधीही करायला तयार आहे, जे ठरलं तसाच मी वागलो. उलट शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव असणार्‍या हुमगावमध्ये मी मायनस कसा? असा प्रतिसवाल शिवेंद्रराजेंनी केला.

या सर्व आरोप-प्रत्यारोपांनी पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एका विवाह सोहळ्यात शिवेंद्रराजे उपस्थित राहिले. त्यानंतर लगेच शशिकांत शिंदेही तिथे आले. दोघे एकमेकांच्या शेजारी बसूनही सुरूवातीला कोणीही एकमेकांशी बोलले नाही. व्यासपीठावर असलेले माजी जि.प. सदस्य राजू भोसले यांनी मानपानासाठी शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे यांना स्टेजवर बोलावले. शशिकांत शिंदे यांच्या हातात टोपी दिली, ती त्यांनी शिवेंद्रराजेंना घातली तर शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना नारळ दिला. दोघांचीही गळाभेट झाली.  व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर दोघे क्षण-दोन क्षण एकमेकांशी कुजबुजले. विवाह सोहळा संपल्यानंतर दोघेही निघून गेले. पूर्वीच्या भेटींमध्ये एकमेकांबद्दलची जी आपुलकी असायची त्यातला ओलावा कमी झाल्याचे चित्र उपस्थितांना दिसले. तरीही झालेली गळाभेट दोन्ही नेत्यांच्या समर्थकांसाठी सुखावणारी होती.