Sun, Mar 24, 2019 04:17होमपेज › Satara › बाहेर चला, दाखवतोच : आ. शिंदेंची डॉ.येळगावकरांना दमबाजी 

बाहेर चला, दाखवतोच : आ. शिंदेंची डॉ.येळगावकरांना दमबाजी 

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:32PM

बुकमार्क करा
सातारा  : प्रतिनिधी

विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकार सातारा जिल्ह्यावर अन्याय करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या आमदारांनी पालकमंत्र्यांवर आगपाखड केली. हा अनुशेष पन्‍नास वर्षांचा असल्याचे सांगत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर टीका केली. यावेळी चुकीचे बोलू नका, तुमच्या विषयात मी कधीच लक्ष घालत नसल्याचे आ. शिंदे यांनी सांगूनही डॉ. येळगावकरांनी टीका सुरूच ठेवली. त्यामुळे संतापलेल्या आ. शशिकांत शिंदेंनी ‘बाहेर चला, दाखवतोच’, अशा शब्दांत डॉ. येळगावकरांना दमबाजी केली. दिवसभर त्याची जोरदार चर्चा सुरू होती.

पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन विकास समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली. मात्र, ऐन वेळचे विषय उपस्थित करून आमदारांनी जिहे-कठापूर योजनेला मिळालेल्या निधीसंदर्भात आ. शशिकांत शिंदे, तसेच आ. जयकुमार गोरे यांनी या योजनेबद्दलची वस्तुस्थिती सभागृहासमोर आणावी, अशी मागणी   केली. त्यावेळी ना. विजय शिवतारे म्हणाले, योजनेच्या खर्चाला तत्वत: मान्यता मिळणे याचा अर्थ 800 कोटींचा निधी योजनेला मंजूर झाला असे होत नाही. योजनेच्या खर्चासाठी तरतूद होईल.

पण, निधी मंजूर झाल्याची खोटी माहिती सांगणे चुकीचे आहे. संभ्रमित माहिती देणार्‍यांना दोन दिवस बरं वाटेल पण चार दिवसांनी सरकारची बदनामी होईल, असे ना. शिवतारे यांनी बजावले. निधीसाठी पाठपुरावा सुरु असून या योजनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. यावर अचानक कोट्यवधींचे आकडे जाहीर केले जात असल्याने भीती वाटते, अशी कोपरखळी आ. शिंदे यांनी मारली. त्यावेळी डॉ. येळगावकरांनी काळजी करु नका. शेवटी सर्वांना आमच्याकडेच यायचे आहे, अशा शब्दांत चिमटा काढला. हा विषय संपला नाही तोच आ. दीपक चव्हाण यांनी महावितरणची कामे रखडल्याने शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे सांगितले.

याच विषयाला जोडून आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे तसेच आ. मकरंद पाटील यांनी विदर्भासाठी सरकार सातारा जिल्ह्यावर अन्याय करत असल्याची टीका केली. सर्व सरकारी योजनांकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन दुटप्पीपणाचा आहे. राज्यात हजारो कोटी खर्च होतात त्यावेळी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ 20-25 कोटी येतात. प. महाराष्ट्र सरकारचा दुष्मन आहे का? केवळ विदर्भाचेच सरकार आहे का? असा सवाल आ. शिंदे यांनी यावेळी केला. त्यावर डॉ. येळगावकर म्हणाले,  अनुशेष हा अनेक वर्षांचा विषय आहे. राज्याचे तीन तुकड्यात विभाजन कुणी केले? डीपीडीसीबाहेरचे विषय घेवू नका, असे सुनावले.

त्यावेळी आ. शिंदे उसळले. ते म्हणाले, जिल्ह्यावर अन्याय होत असल्याने हा डीपीडीसीमधलाच विषय आहे. डॉ. येळगावकरही संतापून म्हणाले, मी अध्यक्षांच्या परवानगीने बोलतोय. अनुशेषाचा मुद्दा जुना असल्याचे ते म्हणाले.  आ. शिंदे म्हणाले, जिल्ह्याला गेल्या 10 वर्षांत निधीची किती तरतुद झाली हे पेपरवर काढा. पेंडिंग वीज कनेक्शन देण्याचे ऊर्जामंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते, असे आ. शिंदे यांनी सांगितल्यावर निधी वाटपाचे सूत्र दहा वर्षांपासून लागू झाले याकडे ना. शिवतारे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर स्टेजवर पाण्याच्या बाटल्या दिल्या पण खाली सदस्यांना पाणी नाही. सभागृहातील अनुशेष दूर करा, अशी खोचक टीका डॉ. येळगावकर यांनी केली.

त्यामुळे आ. शशिकांत शिंदे प्रचंड संतापले. ते म्हणाले, आमची मापे काढू नका. प्रत्येकवेळी यांचं ऐकायचं. मस्तीची भाषा करायची नाही. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत.  बाहेर चला, दाखवतोच, अशा शब्दांत आ. शिंदे यांनी डॉ. येळगावकरांना डोस दिला आणि आ. शिंदे खुर्चीतून उठायला निघाले, तेवढ्यात पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन वातावरण शांत केले. आमदारांच्या कळवंडीने सभागृहात भयाण शांतता पसरली.