Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Satara › माण-खटावला उरमोडीचे पाणी मिळाल्याचे समाधान : शरद पवार 

माण-खटावला उरमोडीचे पाणी मिळाल्याचे समाधान : शरद पवार 

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:29PMदहिवडी : प्रतिनिधी

राज्यात प्रत्येक भागाचे काही ना काही वैशिष्ट्ये आहे. कोकणाचा काजू व आंबा, ठाण्यात उद्योग धंदे, फलटण व बारामतीला साखर कारखानदारी तर माण-खटावला दुष्काळ आहे. दुष्काळी भाग अशी ओळ पुसण्याचा प्रयत्न माणदेशी जनता श्रमदानातून करत असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पाणलोट व जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही खा. शरद पवार यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळेच दुष्काळी माण-खटावला उरमोडीचे पाणी मिळाले असून ही बाब समाधानाची असल्याचेही त्यांनी सांगितले. 

माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावोगावी सुरु असलेल्या श्रमदानाच्या कामामुळे प्रभावित होऊन रविवारी सकाळी नरवणे, ता. माण येथे सुरू असलेल्या श्रमदानाच्या कामास  खा. शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर घार्गे, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुभाष नरळे, ज्येष्ठ नेते वाघोजीराव पोळ, जि.प सदस्या डॉ. भारती पोळ, सोनाली पोळ, खटाव सभापती संदीप मांडवे, माणचे सभापती रमेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य विजय मगर, तानाजी कट्टे, संदीप पोळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. 

खा. पवार म्हणाले, कष्ट, मेहनत करण्याबरोबरच वर्गणी देवून गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहभागी झालात, याचा मला आनंद आहे. राजकारण, मतभेद, संघर्ष बाजूला ठेवून गावचा विकास करण्यासाठी आपण काम सुरू केलेले काम कौतुकास्पद आहे.प्रभाकर देशमुख म्हणाले, खा. पवार साहेब कृषीमंत्री असताना माण खटावसाठी 110 कोटींचा निधी जलसंधारणासाठी दिला. 

गेल्या वर्षी माण खटावसाठी 1 कोटीचा खासदार निधी दिला. त्यांनी सातत्याने माण खटावसाठी भरघोस योगदान दिले आहे. आज त्यांच्या प्रयत्नामुळे तसेच ना. रामराजे नाईक-निंबाळकर, स्व. अभयसिंहराजे भोसले यांचीही  मोलाची मदत मिळाली.  माण तालुक्यात उरमोडीचे पाणी खळाळले. पारंपारिक दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रत्येक माणूस संषर्ष करत आहे. पाण्यासाठी व पुढची पिढी घडवण्यासाठी काम करत आहेत. या जलसंधारणाला मनसंधारणाची गरज आहे, त्यामुळे विकासाचे नवे मॉडेल निर्माण होईल.

 

Tags : satara, man, Dahiwadi, Sharad Pawar,