Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Satara › शिवसेनेचा पाय सत्तेत अडकलायः शरद पवार 

शिवसेनेचा पाय सत्तेत अडकलायः शरद पवार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या हिताचा विचार होत नसेल तर आम्ही सत्तेवर लाथ मारू असे उद्धव ठाकरे म्हणाले. गत तीन वर्षांत सरकारकडून शेतकर्‍यांच्या हिताचा विचार झाला नाही आणि यांचा पाय फेव्हिकॉलमध्ये अडकल्यासारखा सत्तेत अडकला आहे. तो बाहेरच येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे हित होत नाही हे जगजाहीर असतानाही ते असे विधान कसे करु शकतात. ते आमच्या मित्रांचे चिरंजीव असल्याने मी त्यांच्याबाबत फारसे बोलत नाही, असा टोमणा  राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. कराड येथे वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सत्तेत राहून आंदोलन करणे हा अनुभव यापूर्वी महाराष्ट्रातच काय देशातही पाहिला नाही. सत्तेत जायचं आणि सत्तेलाच लाथा घालायच्या हे यापूर्वी आपण कधी पाहिले नाही. त्यांनी नवीन दिशा दाखवून दिली आहे. सत्‍तेत राहून सत्‍तेचा पूर्णपणे लाभ घेऊन पुन्हा सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा? याची नवी दिशा त्यांनी दाखवून दिली आहे.

कर्जमाफीसंबंधी राज्य सरकारने केलेल्या घोषणा, त्याबाबत सलग 6 परिपत्रके काढली. असे असताना आजपर्यंत प्रत्यक्ष शेतकर्‍याला दमडीसुद्धा मिळालेली नाही. मुख्यमंत्री प्रत्येक वेळेला आम्ही एवढी रक्‍कम भरली असे सांगत असतात. परंतु शेतकर्‍यांच्या खात्यावर काहीच जमा झालेले नाही. त्यामुळे हे सर्व ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच...’असा प्रकार आहे. शेतकर्‍यांची  राज्यकर्त्यांच्यावतीने होणारी फसवणूक ही गंभीर बाब आहे. 

कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, जिथे काही करायचंच नाही तिथे महाराजांचे नाव घेतले जाते. निवडणुकीच्यावेळीही त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला होता. तीन वर्षे महाराष्ट्राची फसवणूकच झाली आहे. यापेक्षा वेगळे काहीही नाही. सहकार क्षेत्रातील सुभाष देशमुख यांचे ज्ञान गेली 3 वर्षांपासून आपण बघतोच आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. कर्जमाफी संबंधी आमची काही मते होती, ती आम्ही सरकारला सांगितली होती. सरकारने सगळीच स्विकारली आहेत, असे नाही. आम्ही राज्य करत असताना खड्डयांबाबतचे फोटो आलेले आम्ही पाहिले नाहीत. या तीन वर्षांतच ते येऊ लागले आहेत. रस्ते दुरुस्तीचे काम हे नेहमीच सुरू असते. परंतु हल्ली ज्या दर्जाचे काम होतंय तो दर्जा बघितल्यानंतर ते काम महिना- पंधरा दिवसही टिकत नाही. महाराष्ट्रात राज्यसरकारच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांची अवस्था भयावह आहे, अशी टिकाही पवार यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांचे ते विधान म्हणजे मोठा विनोद..

पक्षाच्या उभ्या आयुष्यामध्ये चव्हाणसाहेबांच्या विचारांच्या जवळपास जाण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही. मुख्यमंत्र्यांची विचारधारा चव्हाण साहेबांच्या विचारांच्या जवळही गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे संपूर्ण विरोधाभास आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हे विधान असेल तर आनंद आहे. परंतु चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र सध्याचे सरकार चालवंतय असं म्हणणे हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे, अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केले.