Mon, May 20, 2019 18:50होमपेज › Satara › पवार साहेबांची 'पॉवर', तासाभरात उभारला ५ कोटींचा निधी

पवार साहेबांची 'पॉवर', तासाभरात उभारला ५ कोटींचा निधी

Published On: Apr 22 2018 1:47PM | Last Updated: Apr 22 2018 2:04PMखटाव : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दौर्‍यात गाडीत बसल्या बसल्या जलसंधारणाच्या कामांसाठी तब्बल पाच कोटींचा निधी जमवत पवारांची पॉवरच एकप्रकारे दाखवून दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती  सह. बँक, जिल्हा परिषद आणि पुणे, मुंबईच्या काही संस्थांनी पवार यांच्या शब्दांवर माण, खटावच्या लोकसहभागातील जलसंधारणासाठी निधी देण्याचे जाहीर केले. 

खा. शरद पवार यांनी माण आणि खटाव तालुक्यांत वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने सुरू असणार्‍या जलसंधारण कामांना रविवारी भेट दिली. माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी पवार यांना दोन्ही तालुक्यांतील जनता घाम गाळत दुष्काळावर मात करण्यासाठी धडपडत असल्याची माहिती दिली. गेल्या वर्षीही त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावांना खासदार फंडातील एक कोटींचा निधी दिला होता.

सहभागी विविध गावांना भेट देताना खा. शरद पवार यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी सरकारवर अवलंबून न रहाता मदत करण्याची ग्वाही दिली. गाडीत बसल्या बसल्याच त्यांनी पवारांची पॉवर वापरली. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले यांना फोन करुन बँकेतर्फे  या कामासाठी मदत करण्याविषयी सांगितले. शिवेंद्रबाबांनीही तत्काळ 1 कोटीची मदत करण्याची तयारी दाखविली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पवारसाहेबांच्या सूचनेवर दीड कोटींचा निधी जलसंधारणासाठी देणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर पवार यांनी पुणे आणि मुंबईच्या काही संस्थांना फोनवरुन दुष्काळी माण, खटावमध्ये सुरु असणार्‍या जलसंधारण कामांना मदत करण्याची विनंती केली. त्या संस्थांनीही तात्काळ दोन ते अडीच कोटींची मदत करण्याचे मान्य केले. खा. शरद पवार यांनी गाडीत बसून तासाभरातच पाच कोटींचा निधी उभा करुन खर्‍या अर्थाने हजारो श्रमदात्यांचा उत्साह वाढवला. श्रमदानातून राज्यात आदर्शवत ठरेल, असे जलसंधारणाचे काम करुन दुष्काळाचे नामोनिशाण मिटवा, लागेल ती मदत करायला मी आहेच, असेही त्यांनी सांगितले.

सरकारची वाट न पाहता लागेल ती मदत करू 

खा. शरद पवार यांनी माण-खटावच्या जलसंधारण कामांची पाहणी करतेवेळी स्थानिक जनतेचा विश्‍वास दुणावला. ते म्हणाले, खटाव आणि माण या दोन्ही तालुक्यांत टंचाईची समस्या गंभीर आहे. कायम पडणार्‍या दुष्काळाला हद्दपार करण्याचा निर्णय इथल्या जनतेनेच घेतला आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी सर्व जण उन्हातान्हात घर, संसाराची पर्वा न करता घाम गाळत आहेत. सुरू केलेले जलसंधारणाचे हे काम काहीही झाले तरी थांबवू नका. या कामांसाठी सरकारच्या मदतीची वाट न पाहता लागेल ती मदत आम्ही करू. आता दुष्काळ हटेपर्यंत हे काम थांबवायचे नाही. या कामातून इथले लोक इतिहास निर्माण करतील, असा विश्‍वासही खा. पवार यांनी व्यक्त केला. 

Tags; Sharad Pawar,  Fund For Water Conservation, Mann, Khatav, Satara