Thu, May 23, 2019 04:58होमपेज › Satara › लोणंदची कृषिपंढरी शेतकर्‍यांनी गजबजली

लोणंदची कृषिपंढरी शेतकर्‍यांनी गजबजली

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:22PMलोणंद : प्रतिनिधी

लोणंदच्या  शरद कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी तोबा गर्दी केल्यामुळे लोणंदची कृषी पंढरी शेतकर्‍यांनी गजबजून गेली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर शेतकर्‍यांची अक्षरश: झुंबड उडाली. अठरा फुटांचा ऊस, 40 किलोचा केळीचा घड, निर्यातक्षम द्राक्षे, 900 ग्रॅमचा पेरू अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालांसह एक टन वजनाचा मुरा जातीचा रेडा हे प्रदर्शनातील पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले. 

लोणंद बाजार समितीच्या आवारावर भरलेल्या पाच दिवशीय  शरद कृषी महोत्सवाच्या दिवशी शेतकर्‍यांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. प्रदर्शनातील शासकीय, अ‍ॅटोमोबाईल, कृषी, बचत गट, फूड, लाईव्ह डेमो आदी सर्वच ठिकाणी सकाळपासूनच शेतकर्‍यांनी गर्दी केली. कृषी विभागाच्या दालनातील प्रत्येक  स्टॉलवरून शेतकरी माहिती घेत होते.

कृषी प्रदर्शनातील कृषी विभागाने उभारलेल्या दालनात 18 फुटवे व  28 ते  35 कांडे  असलेला ऊस,  35 ते 40 किलोचा केळीचा घड, सेंद्रीय पद्धतीने वाढवलेली देशी केळी, खटावमधील शेतकर्‍यांची निर्यातक्षम द्राक्षे, कराड व वाईमधील शेतकर्‍यांनी पिकवलेला 800 ते 900 ग्रॅम वजनाचा पेरू, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, अघोर वांगे, वाई तालुक्यातील गोळेगाव मधील चायनीज व्हिजीटेबल अशा अनेक फळे, भाज्या, शेतकर्‍यांचे मुख्य आकर्षण ठरल्या.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतलेल्या पीक स्पर्धेत ऊस पीकात 24 शेतकर्‍यांनी भाग घेतला. त्यामध्ये नंदू चव्हाण (चव्हाणवाडी ता. फलटण) व सेवानिवृत अतिरिक्त  पोलिस प्रमुख मारुती कराडे, लोणंद यांना प्रथम विभागून, द्वितीय क्रमांक प्रशांत गरुड येणके, ता. कराड व अ‍ॅड. गणपतराव शेळके (लोणंद) यांना विभागून तर तृतीय क्रमांक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व किरण भोसले भरतगाव, सातारा यांना विभागून दिला. उतेजनार्थ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व अशोक धायगुडे मोर्वे यांना मिळाले.

केळी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन गरुड येनके, कराड व बुवासाहेब बागल मांडव खडक, ता. फलटण यांना, द्वितीय राहुल जाधव भाटमरळी, शेंद्रे सातारा व हणमंतराव सुतार पोतले कराड यांना विभागून तर तृतीय क्रमांक प्रताप ननावरे पाडळी, खंडाळा यांनी मिळवला. उतेजनार्थ नारायण शिंदे तरडगाव फलटण व दत्तात्रय जाधव कापील कराड यांना देण्यात आले. कृषी विकास अधिकारी डॉ. चांगदेव बागल व मोहीम आधिकारी बापूसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.

पशुसंवर्धन विभागाने उभारलेल्या पशुदालनात पुणे येथील सुमारे एक टन वजनाचा मुरा जातीचा रेडा मुख्य आकर्षण ठरला. त्याला पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. बैल, खिलार, गीर, संकरीत गाई अशी 75 जनावरे सहभागी झाली. चॅम्पियन ऑफ द शोचा मान दत्तात्रय जाधव खातगुण, ता. खटाव यांच्या खिलार खोंडाला मिळाला. या स्पर्धा जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, तालुका पशूवैद्यकीय अधिकारी अर्चना जगताप, डॉ. गणेश नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.