Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Satara › ‘शांतीदूत’ पुतळा अखेर जैसे थे विसावला

‘शांतीदूत’ पुतळा अखेर जैसे थे विसावला

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 10:59PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूत पुतळा अखेर 18 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी स्थानापन्न करण्यात आला. सातारकर जनतेची लोकभावना व दै.‘पुढारी’ने घेतलेली रोखठोक भूमिका यामुळेच शांतीदूत आहे त्याच मूळ जागी विसावला. 

पोलिस मुख्यालयासमोर 18 वर्षापूर्वी बसवलेला शांतीदूताचा पुतळा पोलिस मुख्यालय सुशोभिकरण व वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करुन सातारा पोलिसांनी दि. 8 फेब्रुवारी रोजी काढला होता. पुतळा काढल्यानंतर सातारकरांनी त्याबाबत तीव्र संताप व्यक्‍त करुन घटनेचा निषेध नोंदवला. दै.‘पुढारी’नेही पोलिसांच्या कृतीचा रोखठोक समाचार घेत लोकभावनेनुसार पुतळा पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवला जावा, अशी भूमिका घेतली.

पुतळा काढल्यानंतर दि. 12 फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी लोकभावना लक्षात घेवून काढलेला पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी लवकर बसवणार असल्याची घोषणा केली होती. अधीक्षकांनी घेतलेल्या या भूमिकेचे सातारकरांनी व माध्यमांनी स्वागत केले. दि. 14 फेब्रुवारी रोजी 18 कबुतर आकाशात सोडून व साखर वाटप करुन या निर्णयाचे स्वागतही करण्यात आले. त्याच दिवशी एसपी संदीप पाटील यांनी पुतळा आहे त्या ठिकाणी बसवणार असल्याचे सांगून मूळ जागेचे भूमीपूजन केले.

दि.14 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सोमवार, दि. 26 रोजी याचे कामकाज पूर्ण झाले. पुतळ्याच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर शांतीदूत पुन्हा क्रेनद्वारे आणून बसवण्यात आला. शांतीदूत पुन्हा आहे त्या ठिकाणी बसल्यानंतर सातारकरांनी पुन्हा मुख्यालयासमोर गर्दी केली होती.