Wed, Apr 24, 2019 21:52होमपेज › Satara › साहेब,‘मला पक्षातून काढण्याइतपत माझं काय चुकलं?’

साहेब,‘मला पक्षातून काढण्याइतपत माझं काय चुकलं?’

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 18 2018 1:05AMकोरेगाव : प्रतिनिधी

विधानसभेची आणखी एखादी टर्म पूर्ण करून मी आनंदाने निवृत झाले असते; परंतु तशी संधी मला त्यावेळी मिळाली नाही, याचा खेद वाटतो. राष्ट्रवादीत राजकीय कारकिर्दीचा सन्मानाने शेवट झाला असता, तर अधिक योग्य झाले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी खा. शरद पवार यांना पत्र पाठवून खंत व्यक्‍त केली. दरम्यान, मी जाहीर केलेल्या आर्थिक निकषाच्या भूमिकेचे आपण आता समर्थन करत आहात. त्यावेळी मला आपण याच मुद्द्यावरून ताकीद देऊन थांबवू शकला असता; परंतु आपण थेट मला काढूनच टाकले. मग पक्षातून काढण्याइतपत माझं काय चुकलं? असा सवालही त्यांनी या पत्रात केला आहे.

डॉ. शालिनीताई पाटील वयोमानामुळे सध्या राजकीय प्रवाहापासून दूर आहेत. मात्र, आरक्षणाच्या आर्थिक निकषाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी नुकतीच भूमिका मांडली होती. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. शालिनीताई यांनी पवारांना पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्‍त केल्या. या पत्रात डॉ. शालिनीताई म्हणतात, आपले सरकार सत्तेवर आले तर आम्ही सरकारी नोकरी 

आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना गुणवत्तेचा विचार करू, आर्थिक निकषाचे धोरण अंमलात आणू, असे लेखी आश्‍वासन  2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिले होते. हाच मुद्दा मी त्यावेळी जाहीरपणे मांडला. राजकारणातल्या माझ्या कारकिर्दीला 60 वर्षे झाली आहेत. आपल्यापेक्षा मी राजकारणात आणि वयानेही ज्येष्ठ आहे.  1999 ते  2009 ही 10 वर्षे मी राष्ट्रवादीची आमदार म्हणून विधानसभेत सन्मानाने बसले.

त्याचवेळी आर्थिक निकषावर आरक्षणाची मी प्रथम पक्षांतर्गत मागणी केली. त्यावेळी मला आपण ताकीद देऊन थांबवू शकला असता; परंतु आपण थेट मला काढूनच टाकले. याच मुद्यासाठी लाखो मराठा बांधव संघर्ष करत आहेत. त्यावेळी मी वयाची सत्तरी ओलांडली होती. माझ्या सक्रिय कामाची थोडी वर्षे उरली होती. विधानसभेची आणखी एखादी टर्म पूर्ण करून मी आनंदाने निवृत झाले असते; परंतु तशी संधी मला मिळाली नाही, याचा खेद वाटतो. राष्ट्रवादीत राजकीय कारकिर्दीचा सन्मानाने शेवट झाला असता तर अधिक योग्य झाले असते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

राजकारणातल्या दीर्घ कारकिर्दीत माझे आणि आपले संबंध नेहमीच तणावाचे राहिले. वसंतरावदादांचे सरकार पाडण्याची घटना असेल किंवा साखर उद्योगात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चेअरमनपदावर राहण्याचा विषय असो माझे आणि आपले टोकाचे मतभेद होते. तरीही आपण मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. दोनवेळा विधानसभेचे तिकीटही दिले, त्यासाठी मी आपले आभार मानते, असे पत्र माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना पाठवले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील शालिनीताई समर्थक कार्यकर्त्यांनाही त्यांनी पत्रे पाठवली आहेत.

मला घरी भेटायला या...

आज मी 85 व्या वर्षामध्ये वाटचाल करते आहे. घरातल्या घरात ओल्या फरशीवर घसरून मी पडल्यामुळे मला आधाराशिवाय चालता येत नाही. तरीही तब्येत बरी आहे. माहिमच्या घरी मुलगा, सून, नातवंडांमध्ये सुखी आहे. आपण मुंबईला असताना कधीतरी माझ्या घरी भेटावे, यासाठी या पत्राद्वारे मी आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहे. मी आपली वाट पाहत असल्याचे डॉ. शालिनीताई यांनी शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

Tags : satara, koregaon, koregaon news, Shalinitai Patil, Assembly election, Term, Sharad Pawar, letter,