होमपेज › Satara › सेक्स वर्कर्स वस्तीचे पुनर्वसन रखडले

सेक्स वर्कर्स वस्तीचे पुनर्वसन रखडले

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 11:13PM

बुकमार्क करा

कराड: अशोक मोहने 

कराड बसस्थानकानजीकची अतिक्रमणे हटवून नगर पालिकेने व्यापारी गाळे (खोकी) काढले. ते गाळे अशा वस्ती जवळ सुरू केले की सुरू होण्याअगोदरच ते बंद पडले. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गाळे त्या ठिकाणी  सुरू आहेत. सेक्स वर्कर्सनी यातील बहुतेक गाळ्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे टाऊन हॉलच्या दक्षिण बाजुकडील रस्त्याने जाण्याचे धाडस सूज्ञ नागरिक करत नाहीत. तेथील वस्तीचे पुनर्वसन करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. 

प्रभाग क्र. 10 मध्ये टाऊन हॉल परिसर, कासमभाई बोर्डिंग, बसस्थानक परिसर, इदगाह मैदान झोपडपट्टी, उर्दू हायस्कूल, मेन रोड पाटण कॉलनी, शिवाजी स्टेडियमच्या दक्षिण बाजुकडील झोपडपट्टीचा समावेश होतो. इंद्रजित गुजर व अर्चना ढेकळे हे या प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. 

या प्रभागात शहरातील बहुतेक झोपडपट्ट्यांचे वास्तव्य आहे. पण वर्षानुवर्षे या झोपडपट्ट्यांचा वापर केवळ पालिकेतील राजकारणासाठीच झाला. परिणामी बकाल अवस्थेतील या झोपडपट्ट्या वर्षानुवर्षे विकासापासून कोसो दूर राहिल्या. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. मात्र त्याचे कामही कासव गतीने सुरू आहे. झोपडपट्ट्यांतील मतांवर पालिकेचे राजकारण करणार्‍या मंडळींनी यामध्ये फारसा रस दाखविलेला नाही. ज्या ठिकाणी झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन होणार आहे त्या इमारतींचे कामही निकृष्ठ झाल्याच्या तक्रारी आहेत. राजेंद्रसिंह  यादव यांनी त्यांच्या मागील कार्यकालात या प्रश्‍नावर लक्ष घातले होते मात्र ते पुन्हा फिंदीस पडले. स्टेडियम लगतची झोपडपट्टी असो की पाटण कॉलनीतील सर्वांचे दुखणे सारखेच आहे. पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे पाण्याच्या टाकीलगत पुनर्वसन केलेल्या गाळेधारकांवर तर उपासमारीची वेळ आली. सध्या तेथे सेक्स वर्कर्सचे वास्तव्य आहे. तेथील सर्व गाळे बंद पडले. दोन वर्षापूर्वी त्या वस्तीत आग लागली होती, पण अग्निशामक दलाची गाडीही तेथे जाऊ शकली नव्हती, अशी भयानक परिस्थिती.  कर्मवीर पुतळा, पोस्ट कार्यालय, यशवंत हायस्कूल समोरील चौक येथे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न फारच बिकट आहे. कचर्‍याची समस्या, अनावश्यक ठिकाणचे मोठे गतीरोधक  ही डोकेदुखी आहेच.