Sat, Apr 20, 2019 18:28होमपेज › Satara › जिल्ह्यातील सेतू कार्यालयांची मुदत संपली

जिल्ह्यातील सेतू कार्यालयांची मुदत संपली

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:24PMसातारा : आदेश खताळ

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, माण, महाबळेश्‍वर, पाटण, जावली या सात तालुक्यांच्या तहसील कार्यालयांतील सेतू कार्यालयांची मुदत संपली आहे. या सेतू कार्यालयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पुढील निर्णयासाठी राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे.  दरम्यान, जिल्ह्यात 804 सेतू, महा-ई-सेवा केंद्रे, तसेच संग्राम केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात नव्याने 446 ‘आपले सरकार केंद्रां’ना मंजुरी दिली जाणार असून त्यामुळे सर्वसामान्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाने  15 वर्षांपूर्वी दाखले वाटपाचा सरकारी कार्यालयांवरील ताण कमी करण्यासाठी तालुका पातळीवर कंत्राटदारांच्या माध्यमातून सेतू कार्यालये सुरू केली. त्यातून सरकारी कर्मचार्‍यांवर होणारा खर्च वाचला. शिवाय, दाखल्यांच्या माध्यमातून संबंधित कंत्राटदार तसेच सरकारला पैसे मिळू लागले. त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे 11 सेतू कार्यालये सुरू झाली. दर 5 वर्षांनी संबंधित कंत्राटदाराकडून निविदा मागवून दाखले, प्रमाणपत्रासाठी आलेल्या कमी दराच्या निविदा मंजूर करून कंत्राटे दिली गेली. सध्या जिल्ह्यातील सात तालुक्यांतील तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयांची मुदत संपली आहे.

त्यामध्ये सातारा, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्यांचे कंत्राट घेतलेले वैभव स्वामी यांची सत्यम स्वयंरोजगार संस्था मलकापूर (ता. कराड), कोरेगाव, जावली तालुक्यांचे कंत्राट घेतलेले निलेश देशमुख यांच्या सत्यजित कॉम्प्युटर पॉईंट, अकलूज (जि. सोलापूर), कराड तालुक्याचे कंत्राट घेतलेले सुनील पाटील यांच्या संगम स्वयंरोजगार संस्था कराड, माण तालुक्यांचे कंत्राट घेतलेले जगदीश बाबर यांच्या जिजाई महिला बहुद्देशीय सेवा संस्था सोनंद (जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. मुदतीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे. तर, उर्वरित चार तालुक्यांतील सेतू कार्यालयांची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. त्यामध्ये वाई व खंडाळा तालुक्याचे कंत्राट घेतलेले वैभव स्वामी यांची सत्यम स्वयंरोजगार संस्था मलकापूर  (ता. कराड),  फलटण तालुक्याचे कंत्राट घेतलेले मेटकरी यांचे जे. एम. एन्टरप्रायझेस फलटण, खटाव तालुक्याचे कंत्राट घेतलेले धैर्यशील कदम यांचे ज्ञानप्रबोधिनी सेवा संस्था पुसेसावळी (ता. खटाव) याचा समावेश आहे.

दरम्यान, शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांना सरकारी कार्यालयांतून विविध दाखले तसेच प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात 11 सेतू कार्यालये, 157 महा ई सेवा केंद्रे तसेच 636 संग्राम केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अशीच केंद्रे सरकारकडून शहरी तसेच ग्रामीण भागात अटी, शर्थीवर दिली जाणार आहेत. या केंद्रांना ‘आपले सरकार’ नाव देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी महा ई सेवा केंद्र किंवा संग्राम केंद्रे असतील त्याठिकाणी नव्याने ‘आपले सरकार’ केंद्र दिले जाणार नाही. पूर्वीची केंद्रे ही 5 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दिली आहेत. त्याठिकाणी पुन्हा केंद्र दिले जाणार नाही. मात्र, 5 हजारच्यावर लोकसंख्या असेल तर त्याठिकाणी दुसरे केंद्र दिले जाणार आहे.या केंद्रांमुळे लोकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नसून ग्रामणी भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.

 

Tags : satara, satara news, Setu Offices, Deadline expired,