Wed, Jan 22, 2020 18:52होमपेज › Satara › नव्या पिढीच्या संसारवेलीसाठी बुजुर्ग एकत्र

नव्या पिढीच्या संसारवेलीसाठी बुजुर्ग एकत्र

Published On: Nov 02 2018 1:13AM | Last Updated: Nov 01 2018 8:26PMसातारा : मिना शिंदे

नव्या पिढीच्या संसारवेलीसाठी बुजुर्ग एकत्र येण्याचा आगळा वेगळा प्रयोग उडतारे, ता. वाई येथे यशस्वीपणे राबवला जात असून या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.  वय निघून जात असलं तरी मुला-मुलींचे विवाह जुळेनात हा सार्वत्रिक सूर लोकांमधून ऐकायला मिळतो. या सामाजिक समस्येच्या निराकरणासाठी वाईदेशी फौंडेशन व  उत्तरा ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वधू-वर सूचक केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

लग्‍न जुळवणे हा दिवसेंदिवस समााजपुढील फार मोठा प्रश्‍न झाला आहे. रास्त अपेक्षांप्रमाणे योग्य वयात आलेल्या मुलामुलींची लग्नकार्य पार पाडावी ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते परंतु  कुटुंब, नातेवाईक, पाहुणे यांच्यातील कमी होत चाललेला संवाद, शिकलेल्या मुला-मुलींच्या व पालकांच्या अपेक्षा,  समाजातील जबाबदार मध्यस्थांचा अभाव  या कारणांमुळे हा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर वाईदेशी फौंडेशनच्यावतीने  घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मोफत वधूवर सूचक केंद्राची स्थापना केली. या केंद्रात दर रविवारी  सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत लग्न जुळवण्याचे काम सुरु असते. गावातील ज्येेेष्ठ नागरिक स्वत: यात सहभाग घेत आहेत. 

नातेसंबंध तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा असणारा संपर्क तसेच वाईदेशी फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभर असलेल्या वलयाचा फायदा घेऊन लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  विविध जातीधर्माच्या लोकांसाठी ही सेवा देण्यात येत आहे. मुलामुलींचा बायोडाटा, पत्रिका व फोटो घेऊन दर रविवारी उडतरे येथे उपस्थित राहण्याचे आवाहनही वध ू-वर सूचक केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

पंचक्रोशीतील विवाह इच्छूक मुलामुलींच्या रास्त अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने विवाह जुळवण्याचा मानस आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  वाईदेशी फौंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असून ज्येष्ठांचे सहकार्य लाभत आहे. सर्वांच्या सहकार्यातून नवे काही तरी उभे करू. - प्रवीण बाबर, अध्यक्ष,  वाईदेशी फौंडेशन