Mon, Jun 01, 2020 23:41
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पाठवण पत्र...

पाठवण पत्र...

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 11 2018 7:45PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

प्रिय, मुली.....

आज तुझा शुभविवाह. तुझ्यासह आमच्या सर्वांच्याच जीवनातील हा मंगलमय सोहळा. आपलं नातं हे आई आणि मुलीचं असलं तरी त्याहीपलीकडे जाऊन एक छान मैत्रीचं असं आपलं अविस्मरणीय नातं असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.  पाळण्याची दोरी हातात घेऊन त्याच झोक्यांवर तुला मोठं करताना त्याच हातात या मंगल अक्षता कधी आल्या हे समजलचं नाही आणि मग हीच पाठवण करताना थोडं मनही मोकळं करावं असं वाटल्यानंच या सदिच्छा पत्राचं निमित्त मिळालं. 

मुली, सगळ्या घरांना दारं असतात तशीच घरातील माणसांच्यातही असतात मायेची कोठारं. हे शिकलीही आहेस आणि आता नव्याने शिकणारही आहेस. प्रत्येक उन्हात असते एक तरी शितल सावली अन् प्रत्येक काट्यावर एखादं कोमल फुल. जीवघेणे खड्डे असतात तसेच असतात मनमोहक झुलते पूल. आजवर जे शक्य झालं ते आम्ही तुला  शिकवलंच आहे, तरीही जमेल तसं शिकत रहा दुनियेच्या शाळेत. व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यांबरोबर गुंफत रहा मायेची वीण आणि वाटून घेऊ नकोस कधी पाणी पाजण्याच्या वृथा शीण. मग आपोआपच शिकशिल की मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहूनही मोलाचं आहे. वेळेला धाऊन आलेल्या प्रत्येकाचं मोल पृथ्वीच्या तोलाचं आहे. शिकावं तू दुसर्‍यांसाठी झिजणं; पण त्यासाठी विसरू नये तू स्वतःचंही फुलणं. फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे आणि फुलवणं हे प्रत्येक मातीचं कर्तव्य. फूल बनून जगताना माती बनायला विसरू नको. नव्या कुटुंबाचं स्वागत करताना आपल्या अंतर्मनाची दारं उघडी ठेवून सर्वांच मनापासून स्वागत कर, कारण तुझ्या किरणांनी या नव्या घराला उजळून टाकण्याचं सामर्थ्य तुझ्यात नक्‍कीच आहे याचा आम्हाला अभिमानच नव्हे तर खात्रीही आहे.   

अंधाराला घाबरणं सोपं अन् दिवा लावणं अवघडं असतं; पण कोणीतरी हे काम करणंही तितकंच गरजेचंही असतं. त्यामुळे वेळप्रसंगी अंधःकारातून तिमिराकडे नेण्याची कृतीशिलता तू नक्‍कीच जप. यापुढचं जीवनातील प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल. काळजीची काळजी करण्यापेक्षा तिचा शांतपणे अभ्यास करून मगच यातून सकारात्मक मार्ग काढ. मग तुलाच समजेल की, काहीवेळा विनाकारण काळजी करून आपण स्वतःच्याच  सावलीला भितो आणि अकारण मूर्ख छळाला शरण जातो.  जमेल तेवढं जग पाहताना आपले डोळेच नव्हे तर द‍ृष्टीही कायम जागृत ठेव.  जीवनात महत्त्वाचा धडा म्हणजे, कारणाशिवाय परिस्थितीला शरण जाणं हा गुन्हा असतोच परंतु विनाकारण बंड करून वादळ उठवणं हादेखील अपराधच असतो; पण म्हणून आपण जळूही नये परिस्थितीच्या कठोर मूर्तीसमोर मूक उदबत्तीसारखं आणि उरूही नये ओठांवर आपल्या कडवट चव जळून गेलेल्या उदबत्तीच्या राखेसारखी. 

आपल्या कल्पना, निष्ठा यावर आपला विश्‍वास असायलाच हवा आणि उघड्या मंदिरासारखी उघडी असावीत आपली सुजाण, समंजस कवाडं. निष्ठा जपण्याची जबाबदारी असते दुसर्‍यांवर हे समजून घेताना मिटू नयेत आपल्या मनांची दारं. ठिपक्या ठिपक्यांना जोडतं जशी रांगोळी साकारते तसेच तु नवं कुटुंबही जोडावं. आपल्या दोन्ही घराण्यांचा उद्धार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आता तुझ्यावर  आहे. नवरा, सासु, सासरे, दिर, नणंद यासह सासरच्या सर्वांनाच आता तुला समजून आणि समजावूनही घ्यायचं आहे.आणि ते  तु निश्‍चितच यशस्वी करशील यात शंकाच नाही. 

शेवटी एक निश्‍चित आहे बेटा,  प्रेम, सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद. या प्रतिसादांसाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साद. तोडणे सोपे आणि जोडणे अवघड ठाऊक आहेच तुला. पण कधीच समजू नको की लग्नानंतर तु पाहुणी झालीस  आम्हाला. भावाइतकचं आपलं घरं कायमचं तुझही आहे. पायाखालची वाळू सरकली तर माहेर तुझं पाठीशी भक्कम आहे. आणि हीच तर खरी तुझ्या पाठवणीची शिदोरी आहे. याच माझ्या भावना आणि हेच मनःपूर्वक आशिर्वादही. 

- सदैव तुझ्या पाठीशी खंबीर. आई.