Mon, Oct 14, 2019 21:55होमपेज › Satara › भंगार व्यवसायातही गुन्हेगारीची पाळेमुळे

भंगार व्यवसायातही गुन्हेगारीची पाळेमुळे

Published On: Nov 26 2018 1:25AM | Last Updated: Nov 25 2018 11:34PMसातारा : विशाल गुजर 

सातारा एमआयडीसीला भंगाराची मोठी समस्या भेडसावत आहे. भंगारात गुन्हेगारीची बिजे रोवली जात असून या व्यवसायात अनेकांनी बरच काही कमावल आहे.   या व्यवसायात घबाड मिळत असून त्या पैशाच्या जोरावरच अपप्रवृत्ती फोफावली आहे. त्यामुळे या व्यवसायावर करडी नजर ठेवण्याची मागणी होत आहे.   

सातारा जुन्या एमआयडीसीत विविध प्रकारच्या 250   कंपन्या आहेत. पैकी 33 बंद अवस्थेत आहेत. तर 7 नवीन कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. तर नवीन एमआयडीसीत 260 कंपन्या आहेत. त्यापैकी 25 बंद अवस्थेत तर 9 नवीन कंपन्याचे बांधकाम सुरू आहे. या विविध कंपन्यांमध्ये हजारो लोक  काम करतात. मात्र या कंपन्यांच्या आजूबाजूला सुमारे तेरा ते चौदा भंगार व्यावसायिक आहेत. या भंगार व्यावसायिकांमध्ये परप्रांतियांचे प्रमाण जास्त आहे. 

भंगार व्यावसायिक, कंपन्या  व पोलिस यंत्रणा यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप खुलेआम होवू लागला आहे. या अभद्र युतीमुळे गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली असून पोलिसांची मात्र चांगलीच छापाछापी सुरु आहे.  सातारा एमआडीसीचा विस्तार वाढत गेला. मात्र औद्योगिक विश्‍वाला आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधांचा अभाव सातत्याने जाणवत राहिला. कंपन्यांमध्ये होणार्‍या चोर्‍या, कामगारांचे संप, उद्योजकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार घडू लागल्याने तसेच परप्रांतीय भंगारवाल्यांच्या दहशतीमुळे एमआयडीसीत अशांतता निर्माण झाली आहे. जुन्या एमआयडीसीत पोलिस चौकी सुरु आहे. मात्र यापासून काही अंतरावरच गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी खून झाला. परप्रांतीय भंगारवालाच या खून प्रकरणातील मुख्य संशयीत आहे. त्याने भंगारात करोडो रुपयांची माया गोळा केली आहे. भंगारात अस काय दडलय? याचे कोडे काही केल्या उलगडत नाही. 

प्रत्येक कंपनीतील वेगवेगळ्या प्रकारचे जॉब तयार केले जातात. मात्र लोखंडी जॉब करताना राहिलेले वेस्टेज मटेरियल (बोरिंग) हे बाहेर पडते. व ज्या कंपनीने हे जॉब करण्यासाठी घेतले आहेत. त्यांना वाया गेलेले हे बोरिंग  परत त्या कंपनीला द्यावे लागते. मात्र असे न करता काही कंपन्या बोरिंग भंगारवाल्यांना देतात. त्यामुळे भंगारवाल्यांना जास्त फायदा होत असल्याने भंगार व्यावसायिक व कंपन्या यांच्यात लागेेबांधे असल्याचेही आरोप होत आहेत. 

कंपनीवाले, भंगारवाले व खाकीवाले मॅनेज असल्याने परप्रांतियांची मुजोरी वाढली आहे. भंगार व्यावसायीकांकडे व्यवसाय करण्याचा परवाना आहे की नाही? याबाबत कधी तपासणी झाल्याचे एकीवातही नाही. भंगार व्यवसायात दडलेल्या गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.