Thu, Apr 25, 2019 06:18होमपेज › Satara › बदल्यांच्या घोळात शैक्षणिक घडी विस्कटली

बदल्यांच्या घोळात शैक्षणिक घडी विस्कटली

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 10:35PMसातारा : प्रवीण शिंगटे

प्राथमिक शिक्षकांच्या योगदानामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा डीजीटल होवून आयएसओ झाल्या. शाळा सिध्दीत ‘अ’ श्रेणीमध्ये आल्या आणि अचानकच  ग्रामविकास विभागाच्या फतव्यानंतर शाळांतील शिक्षकांच्या 70  ते 100 टक्के बदल्या झाल्या. त्यामुळे  सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये बसलेली शैक्षणिक घडी विस्कळीत झाली. याचा परिणाम आगामी विद्यार्थी गुणवत्तेवर, पटसंख्या वाढीवर होणार आहे. 

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेचे अधिकार आपल्याकडे घेवून राज्यातील सुमारे 1 लाख 50 हजार शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या. या ऑनलाईन बदल्यांमुळे अनेक शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झाला आहे. महिला शिक्षिकांना तर दुर्गम भाग दाखवण्यात आला आहे.पारदर्शक बदल्या म्हणायच्या आणि त्याबाबत कोणतीही माहिती प्रसिध्द केली नाही. हे संवर्गनिहाय बदल्या याद्या प्रसिध्द करणे गरजेचे होते. गेल्या महिन्यापासून अनेक वेळा अर्ज, विनंती, आंदोलने करूनसुध्दा याद्या मिळाल्या नाहीत. म्हणजे या ऑनलाईन प्रकारात गैरप्रकार व मानवी हस्तक्षेप झाला असे सिध्द होते. या बदल्यांमध्ये सीईओ लॉगीनवर सर्व पाठवले असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते. जिल्हा पातळीवरील अधिकारी आमच्याकडे काहीही अधिकार नाहीत, असे सांगून हात वर करत आहेत. सर्व काही एनआयसी पुणे यांच्याकडून होते. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्‍न शिक्षकांसमोर आला आहे. या बदल्या करून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल अन्यायग्रस्त शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. 

झालेल्या बदल्यासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. काहींनी चुकीचे दाखले जोडून गैरफायदा घेतला आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी भक्कम पुरावे देवूनसुध्दा आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षक, शिक्षिका यांच्या मनामध्ये बदली प्रक्रियेविषयी नाराजी आहे. या अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धरणे आंदोलने, मोर्चे, आमरण उपोषणे सुरू आहेत. सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्याय ग्रस्त शिक्षक व शिक्षिकांच्यावतीने सोमवारपासून आमरण उपोषण करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.