Wed, Feb 26, 2020 22:42होमपेज › Satara › सातारा : दुर्गम मोगरवाडीत लोकवर्गणीतून उभारतेय शाळा

सातारा : दुर्गम मोगरवाडीत लोकवर्गणीतून उभारतेय शाळा

Published On: Feb 18 2019 11:51AM | Last Updated: Feb 18 2019 11:51AM
तारळे (सातारा) : एकनाथ माळी

देशाला स्वातंत्र्य मिळूनही सात दशकांचा काळ लोटला असला तरी अद्यापही मोगरवाडी (ता. पाटण) हे गाव रस्ता, पिण्याचे पाणी यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचितच राहिले आहे. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक, दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून शाळेची इमारत स्व:खर्चातून उभारण्यास सुरूवात केली आहे. 

डोंगर दर्‍यात वसलेले आणि उन्हाळा, हिवाळ्यासह अतिवृष्टीला तोंड देणारे मोगरवाडी हे गाव आजही स्वातंत्र्य मिळाले नसल्यासारख्याच भीषण अवस्थेत असल्याचेच दिसून येते. १६८ लोकसंख्येचे हे गाव कोंजवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.  आजवर या गावात रस्ताच नसल्याने डोंगरातील पायवाटेने पायपीट करून गावात यावे लागते. रस्त्याची ही अवस्था म्हटल्यावर अन्य सोयी - सुविधांबाबत न बोललेच बरे अशी इथली अवस्था आहे.

गावापासून १०० मीटर अंतरावरील एका मंदिरात शाळा भरते. दोनच शिक्षक असलेल्या या शाळेत विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेतात. लाईटचा अभाव आणि गळके छत यामुळे पावसाळ्यात शिक्षणाची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची अक्षरश: वाताहतच होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत किचन शेडसाठी 1 लाख 4 हजारांचा निधी शासनाने मंजूर केला. मात्र रस्ताच नसल्याने बांधकाम साहित्य आणायचे कसे ? हा मोठा प्रश्‍न गावकर्‍यांसमोर उभा होता. यासाठी बैठक घेण्यात आली आणि लोकवर्गणीतून शाळेची इमारत बांधण्याचा विषय पुढे आला.

मात्र गावची लोकसंख्या व लोकांची आर्थिक परिस्थिती यचा विचार करता शाळेची इमारत म्हणजे एक स्वप्नच ठरणार की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र गावकर्‍यांसह शिक्षकांची जिद्द कौतुकास्पद असून ग्रामस्थ, अधिकारी यांच्यासह दानशूर व्यक्तींमुळे अशक्यप्राय वाटणारे शाळा उभारणीचे आव्हान पेलण्यात यश आले आहे.बांधकाम साहित्य आणण्यासाठी रस्ता बनवण्यात आला. या रस्त्यावरून साहित्य घेऊन येणारे जेसीबीसारखे पहिलेच वाहन पलटी झाले. त्यामुळेच चिंता निर्माण झाली होती. मात्र त्यानंतरही तीन ट्रॅक्टर एकत्र जोडून बांधकाम साहित्य गावात पोहचवण्यात ग्रामस्थांना यश आले.  त्यानंतर युवक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनीच श्रमदान करून शाळेची इमारत उभारण्याचा चंग बांधला.  महिनाभरापूर्वी शाळेच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आणि आता इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळेच शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळेची इमारत बांधणार्‍या ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.