Mon, May 27, 2019 01:18होमपेज › Satara › शालेय मुलांनी वाचवला डोंगर..!

शालेय मुलांनी वाचवला डोंगर..!

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

राजापुरी (ता. सातारा) येथील दुर्गम भागात असणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  गुरूवारी दुपारी अध्यापनाचे काम सुरू असताना शाळेच्या पाठीमागे असणार्‍या डोंगराला वणवा मोठ्या प्रमाणात  लागला होता. हा वणवा शाळा, गवताच्या गंजी व घराकडे येत होता त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी  हा वणवा आटोक्यात आणून शेकडो एकर जंगल वणव्यापासून वाचविले. 
जागतिक महिला दिनी दुपारच्या वेळेत अध्यापनाचे काम सुरू होते. अचानक  शाळेच्या पाठीमागे असणार्‍या  डोंगरावर प्रचंड मोठा वणवा  पेटला होता. तो वार्‍याच्या वेगाने  शाळेकडे  तसेच घरे व गवताच्या गंजीकडे येत होता. शाळेशेजारी असणार्‍या मोरे या ग्रामस्थाने  मदतीसाठी जोरजोरात हाका मारण्यास सुरूवात केली. त्यावेळी शाळेत 50 मुले अध्यापनाचे धडे घेत होती. त्यांपैकी 37 मुले ही पाचवीपर्यंतची होती.त्यावेळी जवळच असलेल्या निरगुडीच्या फांद्या तोडून या मुलांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  काही नागरिकांनीही त्यांना सहकार्य केले.  त्यांनी मुलांना योग्य सूचना देऊन त्यांना मोठ्या  आगी जवळ जाण्यास मनाई केली.

विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,  भारत माता की जय’ अशा घोषणा देत आग आटोक्यात  आणण्यास सुरूवात केली. यामध्ये  मुलींचा सहभाग मोठा होता.  प्राची, प्राजक्‍ता, कांचन, ममता, अमृता, साक्षी, रक्षा, संध्या, संजीवनी, आदिती, प्रणाली, नम्रता या मुलींनी वणवा आटोक्यात  आणण्याचे धाडस केले. मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध करून दाखवले.

गणेश, प्रणव, आदित्य, सुजल, प्रणव, अनिकेत, मयूर, शुभम,  विजय, सिध्दार्थ अशी कितीतरी मुलं देहभान हरपून निसर्गच वाचवताना दिसत होते. त्यांच्या मदतीला अजित मोरे व गणेश दुबळे हे शिक्षकही होते. सुमारे सव्वा तासानंतर हा वणवा पूर्णपणे आटोक्यात  आला.  शाळेच्या पाठीमागे व आजूबाजूला पाहिल्यावर शेकडो एकर डोंगर वणव्यापासून खाक होण्यापासून वाचला गेला.
जागतिक महिला दिनी मुलींनी दाखवलेले आपले धाडस खरंच वाखाणण्यासारखे होते.