Wed, Mar 27, 2019 06:40होमपेज › Satara › शालेय विद्यार्थ्यांच्या बससाठी कसरती 

शालेय विद्यार्थ्यांच्या बससाठी कसरती 

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:25PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अजुनही रामभरोसेच आहे. राजपथावर तर ठिकठिकाणी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी बस पकडण्यासाठी शालेय विद्यार्थी अक्षरश: जीव पणाला लावत असल्याचे भीषण चित्र पहायला मिळत आहे. दररोजच सुरु असलेल्या या कसरतींमुळे पालकही चिंतेत आहेत. मात्र हा जीवघेणा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला आहे. 

सातारा शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास दिवसेंदिवस आणखी धोकादायक होऊ लागला आहे. राजपथावर विविध शाळा आहेत. पोवई नाक्यानजीक महाराजा सयाजीराव विद्यालय, राजपथावर कन्याशाळा तर राजवाडा येथे प्रतापसिंह  हायस्कूल, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळा आहे. राजपथाच्या दक्षिणेस न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा आहे. राजपथ हा शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग आहे. शाळा भरताना आणि सायंकाळी  शाळा सुटताना विद्यार्थी व वाहनांची मोठी गर्दी असते. विशेषत: शाळा सुटण्यावेळी शालेय विद्यार्थी बस पकडण्यासाठी धावाधाव करत आहेत. त्यासाठी वाट्टेल ती सर्कस करण्याकडे या विद्यार्थ्यांचा कल असतो. घरी जाण्याच्या ओढीने सगळेच धावाधाव करत असतात. अनेकदा बस येतानाच फुल्ल भरलेली असते. मग ती थांब्यापासून जरा पुढे जाऊन उभी करण्याकडे चालकांचा कल असतो. मग हे विद्यार्थी आणखी जोरात पळत सुटतात. त्यातून दुर्घटना घडण्याची भीतीही असते. हा जीवघेणा खेळ दररोजच पहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजपथावरील कन्याशाळा परिसरात व्यापारी पेठ आहे. यामुळे गर्दी असते. शाळा सुटताना विद्यार्थी रस्ता ओलांडण्यासाठी  घाई करतात. वाहनांना चुकवत जीव मुठीत धरुन विद्यार्थी रस्ता ओलांडत असतात. न्यू इंग्लिश स्कूल चौकातही वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी नवीन मराठी शाळा आहे. लहान मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालक वाहने शाळेच्या दारापर्यंत आणतात. राजपथावरील महाराजा सयाजीराव विद्यालयापुढे वाहनांची मोठी वर्दळ असते. याठिकाणी  भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सावित्रीबाई  फुले अध्यापक विद्यालय, महिला महाविद्यालय अशी विद्यालये आहेत. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा सुटताना व भरताना मोठी गर्दी असते. वाहतूक पोलिसांची नेमणूक करुनही वाहतुकीची कोंडी चिंतेची बाब झाली आहे. राजवाडा परिसरात प्रतापसिंह हायस्कूल, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळा तसेच अनंत इंग्लिश स्कूलकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने वारंवार धोकादायक स्थिती निर्माण होते.