Sat, Jun 06, 2020 22:24होमपेज › Satara › बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध 

बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध 

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 10:39PMसातारा : प्रवीण शिंगटे 

कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत तरीही शालाबाह्य मुले  राहत असल्याने राज्य शासनातर्फे शाळा बाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी बालरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील  बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणाकडे  देण्यात आली आहे. त्यानुसार  आरटीई 2009 कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी  राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यात एकसुध्दा मूल शाळाबाह्य राहणार नाही, या दिशेने राज्य शासन कार्य करीत  आहे. स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

सन 2016 मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी काही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असल्याचे आढळून आले. शासन निर्णयानुसार शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास  प्राधान्यक्रम देवून बालरक्षक संकल्पना पुढे आली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने  नवनवीन संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी, शाळाबाह्य मुलांना  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  बालरक्षक नियुक्‍त करण्यात येणार आहेत.

प्रत्येक शाळेच्या ठिकाणी एका शिक्षकाची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2710 प्राथमिक शाळांसह अन्य सर्व खासगी शाळामधील शिक्षकच बालरक्षकाची भूमिका बजावणार आहेत. यापूर्वी शिक्षक करत असलेले काम  दिसत नव्हते. आता शिक्षकांचे कामही बालरक्षक चळवळीतून पुढे येत आहे. मुलांविषयी कायदे आहेत त्यातून अनेकदा संघर्ष निर्माण होतात. परंतु, आता मुलांचे प्रश्‍न बालरक्षकांमुळे सुटण्यास मदत होणार आहे.

शासनाने नवीन वेबसाईट तयार केली  असून त्यावर बालरक्षकांची  माहित्या द्यावयाची आहे. बालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट लागू केली नाही. समाजातील  कुठल्याही व्यक्तीस  बालरक्षक म्हणून काम करता येणार आहे. या व्यक्तीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांची माहिती एकत्रीत करावयाची आहे.त्यानुसार नजीकच्या  शाळेत त्या बालकास प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.