Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Satara › पाच-पाच वर्षे मुले शाळेत येऊनही वाचता येत नाही

पाच-पाच वर्षे मुले शाळेत येऊनही वाचता येत नाही

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 27 2018 11:56PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांची राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शाळा घेवून त्यांना चांगलेच खडसावले. पाच-पाच वर्षे मुले शाळेत येवूनही त्यांना वाचायला येत नसल्याची परिस्थिती सातारा जिल्ह्यातील कराड व महाबळेश्‍वर तालुक्यात आहे. मग तुम्ही या विद्यार्थ्यांना कसले शिक्षण दिले? असा सवालही नंदकुमार यांनी केला.

रविवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात  जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी  त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरलेे. 

यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनील मगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, जावेद शेख, डायटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, डॉ. रविंद्र रमणकर, उपशिक्षणाधिकारी हणमंत जाधव  उपस्थित होते. 

सातारा जिल्ह्यातील  शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास केला असता महाबळेश्‍वर व कराड तालुक्यात पाच-पाच वर्षे मुले शाळेत येवून सुध्दा या मुलांना  वाचायला येत नाही. तर असरच्या अहवालानुसार राज्यातील 25 टक्के मुलांना अजूनही वाचता येत नसल्याची खंत नंदकुमार यांनी व्यक्त केली.आपली मुलं खरंच शालेय शिक्षण घेत आहेत का? हे कळतंच नाही त्यासाठी पालकांनी आपल्या मुलाची तितकीच जबाबदारी घेतली पाहिजे.  माणसाला आपल्या मेंदूचा वापर योग्य  पध्दतीने करता येत नाही.  अभ्यास करत असताना तो काळजीपूर्वक केला तर एखादे गणित सुटत असते. मुलांच्या मेंदूची शैक्षणिक काळजी पालकांनी घेतली तरच शिक्षणात मुले प्रतिभासंपन्न होतील, असे ते म्हणाले.

जेवढी मुले शालाबाह्य आहेत ती श्रीमंतांची नाहीत तर कमी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांची आहेत. त्यासाठी सर्व मुलांनाच शाळेच्या प्रवाहात आणणे हे महत्वाचे आहे. अंगणवाडी सेविका मुलांना अंगणवाडीत शिकवत नाहीत त्यामुळेच ही मुले अंगणवाडीत येत नाहीत मुलांना  नुसता खाऊ देवून चालणार नाही तर त्यांना थोडेफार शिकवणेही गरजेचे आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी बालहत्तीसारखे वागून चालणार नाही तर नवेनवे बदल  अंगणवाडीत घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील अंगणवाड्यामधील गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायची आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा परिणाम अंगणवाड्यांवर होत असतो. मात्र आता पालकांचीच मानसिकता बदलण्यास सुरूवात झाली असून इंग्रजी माध्यमाला किती महत्व द्यावयाचे हे लक्षात आले आहे त्यामुळे  पालकांचा मराठी माध्यमांकडेही ओढा वाढला आहे, असे नंदकुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, महाबळेश्‍वर, पाटण, माण, फलटण, कोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 शिक्षक, खंडाळा व वाई तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी काळे, पिसे, मुलाणी, जावलीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, डी.आय.सी.पी.डी.चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांनी  विविध  शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले.