Fri, Jul 19, 2019 01:39होमपेज › Satara › बौद्धकालीन वास्तुवैभव जपूया 

बौद्धकालीन वास्तुवैभव जपूया 

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 8:03PM2006 साली कराड शहर आणि परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक प्रेक्षणीय स्थळांची माहिती अभ्यासकांना व्हावी, पुढील पिढीला कराडचे वास्तू वैभव जतन करता यावे या उद्देशाने ‘ऐतिहासिक कराड दर्शन’ या माहिती पटाची निर्मिती करण्यात आली आहे. या माहिती पटाची माहिती संकलित करत असताना काही गोष्टींची उकल झाली. 

कराडच्या दक्षिणेस आगाशिवच्या डोंगरातील बौद्धकालीन लेण्या आहेत. या शिवाय चचेगावच्या दक्षिण बाजूकडील डोंगर परिसरात व येराडवाडी तसेच वनवासमाची येथे बौध्दकालीन लेण्याचे अस्तित्व आढळून आले आहे. कराड भागात बौध्द धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता, याच्या नोंदीही इतिहासात आढळून येतात. आगाशिव डोंगरपरिसरात बौद्धकालीन लेण्या, गुहा हे त्याचेच प्रतिक आहे. या सर्व बौध्दकालीन लेण्या आहेत. 

आगाशिव डोंगर परिसरात असणार्‍या बौध्दकालीन लेण्यांची संख्या 109 आहे. माहिती पटाच्या अनुषंगाने मी व माझे मित्र विनोद वाडेकर आगाशिव परिसरात लेण्यांची पाहणी करत असताना झाडीत आणखी तीन बौद्धकालीन लेण्या सापडल्या. या लेण्यांवर शासकीय अथवा पुरातत्व विभागाची कसलीच नोंद आढळून आली नाही. पुरातत्व विभागाकडून या तीन लेण्यांच्या नोंदी झाल्या नसल्याचे कळते. पुरातत्व खात्याशी संपर्क साधून या लेण्यांची नोंद व्हावी व लेण्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. 

याचप्रमाणे चचेगावच्या दक्षिण बाजूकडील डोंगर परिसरात बौद्धकालीन लेण्यांचे अस्तित्व आढळते. त्या लेण्यांपर्यंत पोहचण्यासाठी पायवाट नाही. दाट झाडी असल्याने तेथे जाता येत नाही. शिवाय तेथे जंगली श्‍वापदांचा वावर असल्याने लोक त्या परिसरात फारसे जात नाहीत. त्यामुळे या लेण्याही दुर्लक्षित राहिल्या आहेत. 

येराडवाडी या ठिकाणी रूद्रेश्‍वर हे प्रेक्षणीय स्थळ नावारूपास आले आहे. त्या परिसरातही बौध्दकालीन लेण्या आढळून आल्या आहेत.  बौध्द कालीन लेण्यांची सुबक रचना तेथे पहायला मिळते. त्या लेण्यांच्या आतील बाजून 21 खांब आहेत. मध्यभागी स्तुप होता. परंतु तो सध्या अस्तित्वात नाही. त्याचप्रमाणे वनवासमाची डोंगर परिसरात छोट्या छोट्या बौध्दकालीन लेण्या आहेत. कराड परिसरातील हे बौध्दकालीन वास्तू वैभव जपण्यासाठी पुरातत्व विभागाकडून प्रयत्न व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- शरद गाडे, महितीपटाचे निर्माते