Tue, Apr 23, 2019 21:58होमपेज › Satara › शेतकर्‍यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य

शेतकर्‍यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:07PMपाटण : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या हिताची जोपासना करत सहकार क्षेत्राने आर्थिक उन्नतीत मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र आज सहकार क्षेत्र अडचणीत आले असून पारदर्शक कारभारासह नवनवीन उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.

येथील पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे अध्यक्षस्थानी असलेल्या या सभेस ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आज सहकार क्षेत्राला अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागत आहे. संस्थांच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उभा राहिला आहे. या आव्हांनाना यशस्वीपणे सामोरे जात शेतकर्‍यांना रास्त दरात बी-बियाणे, खत उपलब्ध करून देणे आवश्यक असून हे काम खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सुरू आहे. व्यापक शेतकरी हित तसेच जनहितासाठी संघाने सहकार जिवंत ठेवण्याचे कार्य आपल्या प्रगतीतून केल्याचेही सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावेळी सांगितले.

अ‍ॅड. अविनाश जानुगडे म्हणाले, संघाने शेतकर्‍यांच्या हितालाच प्राधान्य दिले असून सर्वसामान्यांशी विश्‍वासाचे नाते निर्माण केले आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विधायक विचाराने आणि अमरसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दिनकरराव घाडगे, शंकरराव जाधव, बापूराव जाधव, प्रतापराव देसाई, राजाभाऊ काळे, संगीता गुरव, सुनंदा पाटील, विलासराव क्षीरसागर, सदाभाऊ जाधव, धैर्यशील पाटणकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यावेळी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मधुकर काळे व शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अ‍ॅड. अविनाश जानुगडे यांनी स्वागत करून अहवाल वाचन केले.  प्रभारी कार्यकारी संचालक गणेश शिंदे यांनी नोटीस वाचन केले. लक्ष्मणराव कदम यांनी प्रास्ताविक केले. व्हाईस चेअरमन हणमंतराव खबाले-पाटील यांनी आभार मानले.