Sun, Aug 25, 2019 00:19होमपेज › Satara › जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन वेळा बदलल्या

जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन वेळा बदलल्या

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:13PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी  प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांचे मस्टर घेतले असल्याने अनेक लेट लतीफ कर्मचार्‍यांचे पितळ उघडले पडले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर सीईओ काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, जि.प.च्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45 असा बदल करण्यात आला असून सीईओ डॉ. कैलास शिंदे यांनी ‘मंत्रालय स्टाईल’ सातारा जिल्हा परिषदेत आणल्याने कर्मचार्‍यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. जिल्हा परिषदेत विविध विभागात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे दररोज विविध विभाग  नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले असतात.

मात्र, अनेक कर्मचारी थम्ब करून गायब होतात. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून  कामासाठी आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी जि.प. प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी सकाळी सर्वच विभागातील कर्मचार्‍यांच्या सह्यांचे मस्टर मागवून घेतले. सकाळी 10 वाजून 5 मिनीटांनी ही सर्व मस्टर सीईओंच्या दालनात आणण्यात आली. त्यामुळे अनेक लेट लतिफ कर्मचार्‍यांच्या सह्या  मस्टरवर राहिल्या होत्या. आपल्या विभागात आल्यानंतर संबंधित कर्मचारी मस्टरवर सही करण्यास गेले असता हे मस्टर अगोदरच सीईओंच्याकडे गेले होते. त्यामुळे  लेटलतीफ कर्मचार्‍यांचे बिंग फुटले. सीईओंनी सामान्य प्रशासन विभागाला प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर सीईओ काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. यापूर्वी कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10.10 ते 5.45 होती. आता कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45 अशी करण्यात आली  असल्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागामार्फत काढण्यात आले असून हे प्रत्येक विभागाला पाठवून त्यावर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सीईओंच्या या नवीन फतव्यामुळे  कर्मचार्‍यांना वेळेत कार्यालयात यावे लागणार आहे. मंत्रालयातील कामकाजाची वेळ 9.45 ते 5.30  अशी आहे. मंत्रालयातीलच कामकाजाची नियमावली जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी चुकीत सापडला की त्याला कागदावर घेवून नोटीसा बजावण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. कार्यालयीन   कामकाजाच्या वेळेत बदल केला असल्याने कर्मचार्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. विविध विभागातील कर्मचारी सुट्टीदिवशीही कामावर येवून आपले कामकाज पूर्ण करत असतात. त्यामुळे या जादा केलेल्या कामाची बदली सुट्टी व मोबदला मिळत नाही. त्यावर प्रशासन काय निर्णय घेणार? असा सवालही कर्मचार्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेत विविध संघटना आहेत. या संघटनांच्या माध्यमातून अनेक कर्मचारी आपल्यावरील झालेल्या अन्यायाविषयी दाद मागत असतात. अनेकदा लेटरपॅडचा वापर करुन अन्य ठिकाणी झालेली बदलीही कर्मचारी सोयीच्या ठिकाणी करुन घेतात. त्यावर अंकुश राहण्यासाठी आता प्रशासनानेच पावले उचलणे गरजेचे आहे. जि.प. प्रशासनाने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. यावर कर्मचारी संघटना काय भूमिका घेतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

... तर नागरिकांच्याही समस्या मिटतील

 कर्मचार्‍यांनी वेळेत आले तर त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील, नागरिकांच्याही समस्या मिटल्या जातील. कार्यालयीन वेळेत कामे पूर्ण झाली तर सुट्टी दिवशी यायची गरजच काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यालयीन वेळेत चार चार वेळा चहाला जाणारे कर्मचारीही जिल्हा परिषदेत आहेत. लग्‍नसराईत तर जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागात गेले तर आख्खा विभाग मोकळा पडलेला असतो. अनेकदा यामध्ये वरिष्ठ सहभागी असल्याचे चित्र दिसून येते. तेव्हा कार्यालयीन वेळांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.