होमपेज › Satara › मेडिकल कामगाराला अटक

मेडिकल कामगाराला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

वैद्यकीय औषधे विकण्याचा परवाना नसतानाही गर्भपातासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्या आणि त्याच्या किटचा साठा कोंडवे (ता. सातारा) येथे  सापडल्याप्रकरणात स्थानिक  गुन्हे अन्वेषन विभागाने प्रवीण ऊर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय 39, रा. मंगळवार पेठ) याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दै.‘पुढारी’ने याबाबत रोखठोक आवाज उठवल्याने संशयिताला अटक झाली असून एलसीबीने कारवाईचा फास आवळल्याने स्वागत होत आहे.

गेल्या आठवड्यात दि. 23 रोजी विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा. अंबेदरे रोड) व विलास पांडुरंग देशमुख (मलकापूर, ता. कराड) या चौघांवर बेकायदा गर्भपात औषधाचा साठा केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्‍न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला. या ठिकाणी एमटीपी किटसह गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली.

स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदानाबाबत गंभीर कायदे असतानाही त्याबाबतच्या गोळ्या, किट सापडल्यानंतरही कारवाईचे घोडे अडकल्याने सातारा तालुका पोलिस ठाणे व अन्‍न, औषध विभाग संशयाच्या भोवर्‍यात सापडले. अन्‍न व औषध विभागाने कारवाई केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ते आठ दिवस हेलपाटे मारत होते. याच दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चौघांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते मात्र पोलिसांनी संशयितांना     

चक्‍क सोडून दिले असल्याची चर्चा आहे.तालुका पोलिसांच्या या कामगिरीचा बभ्रा झाल्यानंतर अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे वर्ग करण्यात आले. बुधवारी या प्रकरणाचा तपास आल्यानंतर एलसीबीचे फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. तपासामध्ये प्रवीण उर्फ बाळासाहेब देशमुख याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतले. प्रवीण देशमुख हा सातार्‍यातील मेडिकलमध्ये कामाला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला रात्रीच अटक करुन शुक्रवारी सकाळी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी संशयिताला दि. 2 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. बेकायदा गर्भपात औषधे सापडल्यानंतर सर्वप्रथम दै.‘पुढारी’ने  आवाज उठवून या पाठीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवून अनेक प्रश्‍न उपस्थित केले. पहिल्या दिवसांपासून दै.‘पुढारी’ने याप्रकरणी पाठपुरावा केल्याने अखेर एका संशयिताला अटक झाली. सुरुवातीला ज्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे ते संशयित पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यामुळे या साखळीत आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
 

 

tags ; Satara,news, without,license,sell, medical, drugs,workers, arrested,


  •