Tue, Jul 16, 2019 22:22होमपेज › Satara › कासचा पाणी उपसा आता विद्युत मोटारीद्वारे

कासचा पाणी उपसा आता विद्युत मोटारीद्वारे

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 10:50PMसातारा : प्रतिनिधी

कास धरणातील वाया जाणारे पाणी पुन्हा तलावाच्या पाटामध्ये  टाकण्यासाठी याठिकाणी थ्री फेज लाईन बसवली असून यापुढे आता विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा केला जाणार आहे. पालिकेच्या या महत्वकांक्षी निर्णयामुळे डिझेलवर होणार खर्च निम्म्याहून कमी येणार आहे.  या थ्री फेज लाईनची यशस्वी चाचणी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम  यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. सातारा नगरपरिषदेमार्फत सातारा शहरातील पश्‍चिम भागामध्ये कास माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. कास धरणापासून ते सांबरवाडी फिल्टर प्लॅन्टपर्यंत पाईपलाईन करण्यात आली असून त्या पाईपलाईनद्वारे पाणी वितरण करण्यात येते.

परंतु जानेवारी महिन्यापासून उन्हाळा सुरु होताच तलावाची पाणी पातळी खालावते. कास धरणातून शहरास रोज आवश्यक असलेल्या पाण्याचा उपसा होत असतो. तसेच तलावात मुरुन जाणारे पाणी यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असते. त्यामुळे तलावातील वाया जाणारे पाणी पुन्हा तलावाच्या पाटामध्ये उचलून टाकण्यासाठी दहा हॉर्स पॉवर क्षमतेचे गेले 15 वर्षांपासून दोन डिझेल इंजिन बसवण्यात आले असून त्या इंजिनाद्वारे वाया जाणारे पाणी पाटामध्ये घेतले जाते. हा खर्च नगरपालिकेला न परवडणारा असला तरी नाईलाजास्तव करावा लागत होता. दरवर्षी होणारा हा खर्च कमी करण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी महावितरण विभागाला थ्री फेज लाईन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर नवनियुक्‍त पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर  यांनी या  विषयाचा पाठपुरावा केला. त्यानुसार नगरपालिकेने महावितरण विभागाच्या सहकार्याने याठिकाणी थ्री फेज लाईन बसवली असून यापुढे आता विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा केला जाणार आहे. 

नगरपालिकेच्या सुमारे 3 ते 4 लाख  रुपयांच्या डिझेलवर व ऑईलवर होणार्‍या खर्चाची बचत होणार आहे. तसेच याठिकाणी डिझेल इंजिन चालवताना चार कामगार लागत होते. परंतु आता याठिकाणी तीनच कामगार लागणार असून एक कामगार कमी लागणार असल्यानेदेखील नगरपरिषदेची बचत होणार आहे. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या हस्ते ही मोटार सुरु करुन पाणी उपशाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, सुधीर चव्हाण, संदीप सावंत उपस्थित होते.