सातारा : प्रतिनिधी
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमधून बाहेर आल्यानंतर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ठगसेन विश्रुत भालचंद्र नवाते याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने आवळल्या. पुणे येथील पाषाण रोड येथे इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करायला गेला असताना शनिवारी रात्री तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याबाबत अधिक माहिती अशी, विश्रुत नवाते (रा. सातारा) या युवकाला सातारा एलसीबीने फसवणुकीच्या गुन्ह्यात चार महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडे कसून चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व सिंधुदुर्ग येथे फसवणुकीचे विविध गुन्हे केले असल्याचे समोर आले. कार, दुचाकी, एलईडी अशा विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर संशयित विश्रुत नवाते याने
आपल्या बँक खात्यात पैसे नसताना चेकद्वारे व्यवहार करून अनेकांची फसवणूक केली होती. सातारा पोलिसांनी नवातेची कुंडली ओपन केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने व त्यातच त्याची तब्येत बिघडल्याने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर तो ठीक झाल्याने प्रिझन वॉर्डमधून 15 दिवसांपूर्वी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्याचवेळी पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईताने पोलिसांना चकवा देवून पळ काढल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. गेले पंधरा दिवस पोलिस नवातेचा शोध घेत होते. अखेर शनिवारी संशयित विश्रृत नवाते हा पुणे येथील पाषाण रोड येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती सातारा एलसीबीच्या पथकाला समजली. पोलिसांनी सापळा रचला असता नवाते सापडला. त्याला अटक करुन सातार्यात आणण्यात आले आहे.