Fri, Jun 05, 2020 20:41होमपेज › Satara › भीमा कोरेगावप्रश्‍नी आज जिल्हा बंद

भीमा कोरेगावप्रश्‍नी आज जिल्हा बंद

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:28PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील भारिप बहुजन महासंघ व फुले, शाहू- आंबेडकरवादी संघटनांनी बुधवार, दि. 3 रोजी सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दलाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीसंदर्भात विविध संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे. संबंधित   घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा समाजातील सर्व घटकांमधून निषेध व्यक्त केला जात आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी भारिप बहुजन महासंघाने सातारा बंद पुकारला आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सचिन माळी, मिनाज सय्यद, जयंत उथळे, राजेंद्र कांबळे, कृष्णा गव्हाळे, काका गाडे, अमर गायकवाड, शितल साठे, गणेश भिसे, सिद्धार्थ खरात यांनी जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, एस. टी विभागनियंत्रक यांना निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनाला श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, दंगलीसंदर्भात समाजभावना भडकावणार्‍या पोस्ट, मॅसेज, अफवा सोशल मिडीयावर पसरवणार्‍या समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा पध्दतीच्या पोस्ट प्राप्त झाल्यास त्यावर विश्‍वास न ठेवता त्वरित डिलीट कराव्यात व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, भिमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. पाचगणीतही निषेधाचा फलक लावण्यात आला असून पाचगणीच्या मुख्य छत्रपती शिवाजी चौकात घोषणा देण्यात आल्या व भिमा कोरेगाव येथील झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.