Tue, Jan 22, 2019 23:10होमपेज › Satara › सूर्य आग ओकतोय...

सूर्य आग ओकतोय...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

कोरड्या वातावरणामुळे सातारा शहर व परिसरात उन्हाची तीव्रता कायम असून शुक्रवारी सातार्‍यात 38.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या  महाबळेश्‍वरचे  कमाल तापमान 33.1 अंश सेल्सिअसवर होते. त्यामुळे गेल्या काही  दिवसांपासून सूर्य आग ओकतोय, अशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असल्याने नागरिक चांगलेच घामाघूम झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरासह जिल्ह्यातील उकाड्यात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी 9  वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तसेच भर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका बसत असून कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण, तर कधी अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा तडाखा अशा संमिश्र तापमानामुळे नागरिक चांगलेच घामाघूम झाले आहेत. नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असून बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. अगदी मे महिन्यातील कडक उन्हाप्रमाणे आत्ताच उन्हाची तिरीप लागत आहे. पुढील एप्रिल व मे या दोन महिन्यांत तर शहर व परिसरातील  परिस्थिती आणखी भयावह ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी सातारा शहराचे कमाल तापमान 38.5 व किमान 18.3 अशांवर होते. तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरचे  कमाल तापमान 33.1 व किमान 19.5 अशांवर होते. शहर व परिसरात अधूनमधून ढगाळ वातावरण जाणवत होते. तरीही  वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. तीव्र उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहर व परिसरातील रस्ते ओस पडत आहेत.  कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांबरोबर नागरिकांची वर्दळ दिसेनासी झाली आहे. एरव्ही सायंकाळी गर्दीने बहरणार्‍या उद्याने व बागामध्ये दुपारीच नागरिकांची गर्दी होत आहे.

वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणार्‍या पदार्थाकडे वळवला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर  शहर व परिसरातील रस्त्यासह विविध दुकानात  आता टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले आहेत. उन्हापासून संरक्षण करणार्‍या कॉटन व वाळ्याच्या  टोप्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसत आहे. 

बाजारात मातीचे डेरे, माट, रांजण विक्रीसाठी आले आहेत.तसेच फ्रीज, पंखे, कुलर यांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोल्ड्रींक्स हाऊस, शितपेये, आईसस्कीम पार्लरच्या दुकानात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. तसेच सरबत व आईसस्क्रीम विक्रीच्या गाड्यावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. फळांच्या रसाबरोबरच ताक, लस्सी, यासारख्या थंडपेयांना चांगली मागणी आहे. मोसंबी, संत्री, कलिगंड, अननस, द्राक्षे, काकडी, टरबूज या फळांनाही ग्राहकांमधून चांगली मागणी आहे.
 


  •