Fri, Sep 21, 2018 05:50होमपेज › Satara › तलाठी, कोतवाल लाच मागितल्याबद्दल ‘जाळ्यात

तलाठी, कोतवाल लाच मागितल्याबद्दल ‘जाळ्यात

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:24PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

तक्रारदार यांनी खुदाई केलेल्या विहिरीची नोंद सात-बारावर घेऊन तो दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बुध, ता. खटाव येथील तलाठी व कोतवाल या दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तलाठी संदीप गोरखनाथ काटकर (वय 38, सध्या रा.कोडोली, सातारा. मूळ रा.नरवणे ता. माण) व कोतवाल संजय जोतीबा चव्हाण (48, रा. बुध) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांनी विहीर खुदाई केली असून त्याची त्यांना सात-बारावर नोंद करायची होती. या कामासाठी तक्रारदार हे तलाठी काटकर व कोतवाल चव्हाण या दोघांना भेटले असता संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबधंक विभागात दि. 28 नोव्हेंबर 2017 रोजी तक्रार केली. एसीबीच्या विभागाने त्याबाबतची पडताळणी केली असता संशयित दोघांनी 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पैशाची मागणी  केल्यानंतर संशयितांनी ती रक्कम मात्र स्वीकारली नाही. कोणत्याही शासकीय अधिकार्‍यांकडून लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार द्यावी. तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.