Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Satara › शांतिदूत बसवण्याचे काम आजपासून

शांतिदूत बसवण्याचे काम आजपासून

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कबुतराचे शिल्प पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवण्याच्या प्रक्रियेला बुधवारी (दि. 14) सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, शांतिदूतप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते साखर व पेढे वाटप करण्यात येणार आहे. दि. 14 मे 2000 रोजी सातारा पोलिस मुख्यालयासमोर शांततेचा संदेश देणारा कबुतराचे शिल्प बसवण्यात आले होते. मुख्यालयाची दिमाखदार इमारत व त्याच तोलामोलाचा कबुतराचा पुतळा यामुळे सातारकरांचे त्या पुतळ्याशी भावनिक ऋणानुबंध निर्माण झाले होते.

तब्बल 18 वर्षांनंतर बुधवार, दि. 8  रोजी सुशोभीकरण व वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण समोर करून पोलिस दलाच्या वतीने कबुतराचा पुतळा हटवण्यात आला होता. पुतळा हटवत असताना सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्धी माध्यमांनी त्याला जोरदार विरोध केला; मात्र पोलिसी बळ वापरत अखेर मध्यरात्री मुख्यालयासमोरून पुतळा हटवण्यात आला.  याबाबत दै.‘पुढारी’ने रोखठोकच्या स्वरूपात सातारकरांच्या भावना व्यक्‍त केल्या होत्या. अत्यंत परखडपणे ‘पुढारी’ने हा विषय हाताळल्यानंतर  सातारकरांमधील उद्रेकाची भावना व्यक्‍त झाली. ‘पुढारी’च्या  याबाबतच्या लढ्याला व्यापक प्रतिसाद मिळत गेला. 

नागरिकांकडून संतप्‍त भावना व्यक्‍त होण्यास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी यांना भेटून सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदवला. ज्यांनी पुतळा बसवला ते  निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनीही सातार्‍यात येऊन संताप व्यक्‍त केला. गेल्या चार दिवसांत  कबुतराचा पुतळा हटवल्यावरून पोलिस दलाविरुद्ध टीकेची झोड उठली होती. अखेर मंगळवारी  पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी     

सातारकरांच्या भावनांचा आदर राखत कबुतराचा तो पुतळा आहे तिथेच बसवणार असल्याचे जाहीर केले. याबाबतची भूमिका त्यांनी जाहीर केल्यानंतर त्याचे समाजमनातून स्वागत करण्यात आले. सोमवारी ही घोषणा झाली असून मंगळवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने बुधवारपासून कबुतराचा पुतळा पूर्वी होता तसा बसवण्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे. कबुतराच्या पायाभरणीसाठी तेवढ्याच ताकदीचे व तोलामोलाचे काम पोलिस करणार आहेत. बुधवारी या कामकाजाला सुरुवात होणार असल्याने ते लगेच एकाच दिवसात होणार नाही.

यासाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अठरा वर्षापूर्वी कबुतराच्या पुतळ्याच्या पायाभरणीचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिले होते त्याच्याकडूनच पुतळा हटवण्याचे काम करून घेण्यात आले आता पुन्हा पुतळा बसवला जाणार असल्याने त्याच कॉन्ट्रॅक्टरला   पाचारण केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले