Mon, May 27, 2019 06:41होमपेज › Satara › शांतीदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसवा

शांतीदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसवा

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर असणारा शांतीदूत पुतळा हटवल्याने दुसर्‍या दिवशीही सातारकरांनी संताप व्यक्‍त केला. हा पुतळा आहे त्याच ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावा, यासाठी अनेक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिली असून सातारकरांचा उठाव होण्याची चिन्हे आहेत.  शनिवारी सामाजिक संघटनांसह सातार्‍यातील नगरसेवकांनीही याप्रश्‍नी पोलिसांच्या कृतीला जोरदार विरोध दर्शवला. 

शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुपचूप जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूतचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसार माध्यमे व सामाजिक कार्यकर्त्यांनी अटकाव केला. मात्र, पोलिसांनी हा पुतळा पोलिसांचा असून याचे काय करायचे ते पोलिसांना ठरवू द्या, असे सांगत विरोध मोडीत काढला होता. दै.‘पुढारी’ने रोखठोकच्या माध्यमातून शांतीदूत पुतळा हटवल्याप्रकरणी जोरदार आवाज उठवला होता. त्यामुळे शनिवारी या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू होती. सातारकरांनी शांतीदूत पुतळा ज्या पद्धतीने हटवला त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

याबाबत सातार्‍यात जागृती झाल्याने विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा शांतीदूत आहे, त्याच ठिकाणी पुन्हा बसवण्यात यावा,    मागणीसाठी आता जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याप्रश्‍नी  सातारकरांचा विरोध एकवटत असल्याचे चित्र शनिवारी दिसले. अनेक संघटना, सामाजिक, सेवभावी कार्यकर्ते यांनी याबाबत एकत्र येवून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी चर्चा केली. त्यामुळे हे प्रकरण पोलिस यंत्रणेला महागात पडण्याची चिन्हे आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, रविंद्र कांबळे, दलित महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, शिवांतिका सामाजिक संस्थेचे गणेश दुबळे, शिवसेनचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, आम आदमीचे सागर भोगावकर, स्वाभिमानीचे शंकर शिंदे, रिपाइंचे फारुखभाई पटणी, शिवसंग्रामचे प्रशांत नलवडे, रमेश बोराटे, जोतीबा भिलारे, सचिन जगताप आदिंनी या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, खोपडे यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली असून यामध्ये आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. तसेच हा शांतीदूतचा पुतळा  र्‍याबाहेर जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार शनिवारी त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स कायम आहे.