होमपेज › Satara › सातार्‍यातील रनर्स धावत जाणार पंढरीला

सातार्‍यातील रनर्स धावत जाणार पंढरीला

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 8:17PMकण्हेर : बाळू मोरे

मॅरेथॉनमध्ये अग्रेसर असणार्‍या सातार्‍यातील रनर्स ग्रुपने वारीचा महिमा आणखी गडद करणारा अनोखा उपक्रम हाती घेतला असून सुमारे 16 रनर्स पंढरपूरपर्यंत धावत जाणार आहेत. वारकर्‍यांच्या वेशात हे ‘रनर्स वारकरी’ धावणार असून पंढरीत जावून विठ्ठलाला स्ट्राँग अँड फिटचे साकडे घालणार आहेत. ‘बा विठ्ठला सर्वांना निरोगी व सदृढ आरोग्य लाभण्यासाठी तंदूरुस्त राहण्याची सुबुध्दी दे’, अशी आर्जवच ते विठ्ठल चरणी करणार आहेत. 

सातार्‍यातील रनर्स ग्रुप नेहमीच अनोखे उपक्रम राबवून निरोगी आयुष्याचा मूलमंत्र देत असतात. भल्या पहाटे उठून धावणे, व्यायाम करणे, विविध योगासने करणे या माध्यमातून तंदुरुस्तीचा संदेश देणार्‍या या ग्रुपने आता आषाढी वारीसाठीही असाच एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार या ग्रुपचे 16 सदस्य पंढरीच्या वारीला धावत जाणार आहेत. 

रविवार दि. 22 रोजी तालीम संघ, सातारा येथून सकाळी 6 वा. सातारा ते पंढरपूर ही ‘रन वारी’ मॅरेथॉन धावणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी या ग्रुपचे प्रशिक्षक रामसिंग सर यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मॅरेथॉनमधील 16 रनर्स या वारीमध्ये सहभागी होणार असून ही रन सुमारे 165 कि.मी. अंतराची आहे. तालीम संघ मैदान येथून ‘रन वारी’तील वारकरी व मॅरेथॉन रनर्सच्या उपस्थितीत तसेच विठू नामाच्या व टाळ मृदुंगाच्या गजरात या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. या ‘रन वारी’साठी विठ्ठल रुक्मिनी ट्रस्टचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले व मॅरेथॉनच्या संयोजकांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

जिल्ह्यात प्रथमच रनर्सनी आगळा वेगळा धार्मिक उपक्रम राबवला असून या ‘रन वारी’चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या ‘रन वारी’मध्ये मार्गावर जागोजागी अन्न, पाणी व वैद्यकीय सुविधा यांची सोय केली आहे. दरम्यान ही वारी सोमवार दि. 23 रोजी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे पोहचून पांडुरंगाचे दर्शन घेवून सर्व जणच फिट अ‍ॅण्ड स्ट्रॉग राहू दे, असे श्री विठ्ठल चरणी साकडे घालण्यात येणार असल्याचे युवा नेते संदीपभाऊ शिंदे, रनर्स राजेंद्र गायकवाड व नवनाथ डिगे यांनी सांगितले आहे.