Thu, Jun 27, 2019 09:59होमपेज › Satara › राज ठाकरेंच्या दौर्‍यामुळे मनसेत चैतन्य

राज ठाकरेंच्या दौर्‍यामुळे मनसेत चैतन्य

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:43PMसातारा : प्रतिनिधी 

सातारा जिल्ह्यात मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध आंदोलनातील सहभागी नागरिक व शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्‍नावर पुढील ध्येय धोरण ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी आंदोलनाशी संबंधित सर्व पदाधिकार्‍यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे जिल्ह्यातील मनसेमध्ये चैतन्य पसरले असून त्यांनी पदाधिकार्‍यांच्या कामांची दखल घेऊन कौतुक केल्याने  कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. 

मनसेच्यावतीने सातार्‍यात पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात  आला होता. या मेळाव्यासाठी राज ठाकरे दोन दिवशीय जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी सातार्‍यात आल्यानंतर संदीप मोझर यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. तसेच निवासस्थानी आलेल्या जिजामाता महिला बँकेचे ठेवीदार, मायक्रोफायनान्स पिडित माता-भगिनी, शेतकर्‍यांशी चर्चा केली. त्यांच्या व्यथा ऐकून यावर ठोस उपाय करण्याचे आश्‍वासन दिले. 

जिजामाता महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी समस्या मांडल्यावर राज ठाकरे यांनी  याप्रकरणी सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्यासाठी व पुढील धोरण ठरवण्यासाठी मुंबई येथे बैठकीचे नियोजन करण्याचा शब्दही ठाकरे यांनी दिला. मुंबईत होेणार्‍या बैठकीला ठेवीदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या दौर्‍यात राज ठाकरे यांनी पत्रकार व उद्योजकांशी विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा करून सातारा जिल्ह्यातील प्रश्‍न समजावून घेतले. सातारा जिल्ह्यातील  पदाधिकारी मेळाव्याचे नेमके आणि नेटके संयोजन केल्याबद्दल संदीप मोझर व  त्यांच्या सहकार्‍यांचे राज ठाकरे यांनी कौतुक केले. 

राज ठाकरे यांच्या या दौर्‍यामुळे मनसेमध्ये चैतन्य निर्माण झालेे आहे. तसेच गतीने समाजकार्य करण्यासाठी बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया संदीप मोझर यांनी दिली. दरम्यान अ‍ॅड. विकास पाटील -शिरगावकर यांनी  त्यांच्या गावी स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊ नये यासाठी संपूर्ण गावात कार्यान्वित केलेल्या प्रतिबंधात्मक उपक्रमाची  माहिती घेतली. या प्रकल्पाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली आहे. हा प्रकल्प गावोगावी राबवला जावा यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.