Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Satara › वनविभाग ढिम्म, वणवे लावणारे मोकाट

वनविभाग ढिम्म, वणवे लावणारे मोकाट

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 8:53PMसातारा : प्रवीण शिंगटे 

फेब्रुवारी महिना सुरू होताच जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण  जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यामुळे डोंगरदर्‍यासह जंगलातील गवत पूर्णपणे वाळून आहे. थोडीशीही ठिणगी पडताच त्याला वणव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वणवे थांबवणे हे वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. तथापि, ढिम्म वनविभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने वणवे लावणारे मोकाट आहेत. वणवे लावण्याची प्रवृत्ती वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या विषयावर आजपासून क्रमश: मालिका...

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी पालापाचोळा गोळा करतात.  शेतात पिके चांगली यावीत, या उद्देशाने दरवर्षी आपल्या शेताच्या ठिकाणी पालापाचोळा जाळून टाकतात. शेताच्या जवळच डोंगर असल्याने शेतातील पालापाचोळ्याची  ही आग पसरत जाऊन वणव्याचे रूप धारण करते. वणवे लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. 
आग लावल्यानंतर ती विझविणे संबंधित शेतकर्‍याची जबाबदारी आहे. मात्र, शेतकरी तसे न करताच घराकडे परततात. त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते व जंगलाचे मोठे नुकसान होते. या सर्व बाबी टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

मात्र, जनजागृतीचे काम वन विभागाच्या मदतीने पाहिजे त्या प्रमाणात केले जात नाही.  सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाटण, कराड, सातारा, वाई, महाबळेश्‍वर, जावली व खंडाळा तालुक्यांत ठिकठिकाणी दाट जंगल आहे. त्यामुळे वणव्यांची समस्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वन विभागाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजना अत्यंत तोकड्या असल्याचे दिसून येत आहे. वणव्याने रौद्ररूप धारण केल्यानंतर या वणव्यात दरवर्षी कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. त्यामुळे वन विभागाने आग थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.