Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Satara › उपसासिंचन योजनांसाठी सौर ऊर्जेची पडताळणी

उपसासिंचन योजनांसाठी सौर ऊर्जेची पडताळणी

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 8:39PMसातारा : प्रतिनिधी

राज्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा करणार्‍या सर्व उपसा सिंचन योजनांना मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करून या समितीने सर्वसमावेशक परिपूर्ण बृहत आराखडा एक महिन्यात सादर करण्याचे आदेश शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्राकरता सुमारे 30 टक्के  ऊर्जेचा वापर होतो. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होत असून त्यामधून महावितरण कंपनीस महसुली तोटा  सहन करावा लागतो.

परंतु अशा परिस्थितीत देखील शेतकर्‍यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्याकरता महावितरण कंपनीस शासनाकडून मोठ्या प्रमाणात  दरवर्षी अनुदान देण्यात येते. महावितरण कंपनीकडून कृषी ग्राहकांचा वीज दर माफक ठेवण्यासाठी वाणिज्यिक व औद्योगीक वीज ग्राहकांकरता क्रॉस सबसिडी रूपाने अधिक वीज दर आकारण्यात येतो.राज्यातील  शेतकर्‍यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार  वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातून  शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना  सुरू केली आहे.

शेतीसाठी पाणी पुरवठा करणार्‍या  सर्व उपसा सिंचन योजनांना वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी प्रकल्पाद्वारे महानिर्मिती कंपनीकडून प्रयत्न करण्यात येतील, अशी कायद्यातही तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने सर्व उपसा सिंचन योजनांचा आढावा घेवून त्यानुसार एक बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक सर्व बाबी, कामकाज, कार्यपध्दती, अंमलबजावणी निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

महासंचालक महाउर्जा हे समिती अध्यक्ष असून  सतीश चव्हाण संचालक (वाणिज्य)  महावितरण, मुंडे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग हे समितीचे सदस्य आहेत तर  अतिरिक्त महासंचालक महाऊर्जा हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सर्व उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर राबवण्यासाठी सर्व  उपसा सिंचन योजनांचा एक बृहत आराखडा तयार करणे, ही समिती राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर राबवण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व  बाबी, कामकाज,  कार्यपध्दती, अंमलबजावणी व मॉडेल्सची निश्‍चिती करणार आहे.

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालण्यासाठी सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागेचा शोध  जलसंपदा विभागाकडून महावितरण व महाऊर्जाच्या  अधिकार्‍यांच्या सहयोगाने घेण्यात येईल. सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार आहे.