होमपेज › Satara › जिल्ह्यातील रुग्णालयांना ‘प्रदुषण’च्या नोटिसा

जिल्ह्यातील रुग्णालयांना ‘प्रदुषण’च्या नोटिसा

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:32PMसातारा : प्रतिनिधी

वाई व जावली तालुक्यात जैववैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त टाकल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नोंदवला असून याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 260 रूग्णालयांना जैववैद्यकीय कचर्‍याबाबत कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

वाई येथील एमआयडीसीमध्ये अज्ञाताने जैव वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त टाकला होता. यावेळी येथील पालिका, महसूल, पोलिस व प्रदुषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेवून अज्ञातावर गुन्हा नोंदवला होता तसेच त्या कचर्‍याची विल्हेवाटही लावण्यात आली. हा प्रकार शांत होतो न होतो तोच जावली तालुक्यातील मार्ली घाटात पुन्हा अज्ञाताने मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा टाकला. याप्रकरणी पुन्हा पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. कचरा कोठून आला आहे याची तपासणी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.त्यांनतर अधिकार्‍यांकडून संबंधिताना सूचना देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील 260 रूग्णालयांना प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सातार्‍याचे उपप्रादेशिक अधिकारी बी.एम. कुकडे यांनी दिली.
संबंधित रूग्णालयांना बजावलेल्या  नोटीसामध्ये जैववैद्यकीय कचरा कुठे टाकला जातो ? त्याची कशाप्रकारे विल्हेवाट लावली जाते. त्याचा वार्षिक अहवाल व सविस्तर  माहिती 7 दिवसात प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित रूग्णालयांनी 7 दिवसात कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक अधिकार्‍यांकडे  अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे बी.एम. कुकडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सुमारे 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही प्रदुषण नियंत्रण मंडळाने जैववैद्यकीय कचर्‍याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.