Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Satara › लाच मागितल्याप्रकरणी बरड चौकीतील पोलिसाला अटक

लाच मागितल्याप्रकरणी बरड चौकीतील पोलिसाला अटक

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:09AMसातारा : प्रतिनिधी

वाळू वाहतुकीसाठी अडथळा न करण्यासाठी दरमहा 7 हजार  रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बरड पोलिस चौकीचा पोलिस हवालदार अतुल सदाशिव सोनटक्के (वय 47,  रा. जाधववाडी, ता. फलटण) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर असून तो वाळू वाहतुकीसाठी वापरला जातो. वाळू वाहतुकीला अडथळा न करण्यासाठी सपोनि बुरसे व पोलिस हवालदार सोनटक्के यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणीचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी पुणे  लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात केला. पुणे कार्यालयात हा तक्रार अर्ज आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कांचन जाधव यांच्याकडे तो तपासासाठी देण्यात आला.

सातारा पोलिस दलातील फलटण  पोलिसांविरुद्ध पुणे एसीबीला लाचेप्रकरणी तक्रार अर्ज आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याबाबत पडताळणी केली असता ट्रॅक्टरला वाळू वाहतूक करण्यासाठी पोलिस हवालदार अतुल सोनटक्के यांनी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. लाचेच्या रकमेची मागणी झाल्यानंतर पोलिस ती लाच कधी व केव्हा घेणार? यासाठी वाट पाहत होते. मात्र पोलिसाने लाचेची रक्‍कम स्वीकारली नाही. लाचेची रक्‍कम स्वीकारली जात नसल्याने अखेर दि. 9 एप्रिल रोजी संशयित पोलिस अतुल सोनटक्के याच्याविरुध्द लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

लाचेच्या मागणीप्रकरणी फलटण पोलिसाला अटक झाल्यानंतर फलटणसह सातारा पोलिस दलात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी पुणे येथील एसीबीशी संपर्क साधल्याने त्याबाबतही कौतुक होत आहे.  दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सातारा लाचलुचप प्रतिबंधक विभाग करणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

 

 

tags : Satara,news,police, constable, Atul, Sadashiv ,Sontakke,case,bribe, demand, arrested ,