होमपेज › Satara › प्लास्टिकमुक्त जिल्हा उपक्रम राबवणार

प्लास्टिकमुक्त जिल्हा उपक्रम राबवणार

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:21PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत व्हावी. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे  प्लास्टिक मुक्त जिल्हा हा उपक्रम राबविण्यात येणार असून दि. 28 ते 30 डिसेंबरअखेर गावपातळीवर कृती कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे  जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिण्यासाठी असुरक्षित पाण्याचा वापर, उघड्यावरील  हागणदारी, चुकीच्या पध्दतीने प्राण्यांच्या  मलमुत्राचे व्यवस्थापन, अस्वच्छ परिसर, वैयक्तीक पातळीवर पाणी व अन्न पदार्थाची असुरक्षित हाताळणी अथवा साठवणूक इ.बाबी देशातील अनेक रोगांची मुख्य कारणे असल्याचे दिसून येतात. गावागावांमध्ये रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढिग दिसून येत आहेत. विशेषत: यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व इतर प्लास्टिक कचर्‍यासहित गटारे, ओढे, नाले, नद्या, तलाव व गावाच्या परिसरात टाकलेले आढळते.

यामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होणे तसेच  माती व हवा ही प्रदूषित होत आहे. याचा परिणाम मानवासह पशु, पक्षी नद्यातील जलचर नष्ट होण्यापर्यंत झालेला असल्याचे डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
दि. 28 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत पातळीवर शासकीय कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव बैठक व वॉर्डनिहाय बैठका घेवून उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.प्लास्टिक संकलन उपक्रमामध्ये शालेय  व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा मंडळे, बचत गट, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स  क्लब, एन.एस.एस चे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी तलाठी, बँका, पतसंस्था, विकास सेवा सोसायटी, विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी,  अधिकारी  यांचा सहभाग घेण्यासाठी सरपंच व सदस्यांनी वैयक्तीक भेट घेवून उपक्रमात सहभागी होण्याविषयी आवाहन करण्यात यावे. 

दि. 29 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत परिसरातील  शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, बँका, पतसंस्था, सेवा सोसायट्या, शासकीय व अशासकीय कार्यालये, पटांगणे, मोकळ्या जागा, सार्वजनिक इमारती व परिसर , मंदिरे, रस्ते, ओढे , नाले , नद्या  आदी ठिकाणी विखुरलेले प्लास्टिक संकलीत करण्यात येणार आहे. दि. 30 डिसेंबर रोजी प्रत्येक कुटुंबास भेट देवून त्यांच्याकडील  अनावश्यक प्लास्टिक संकलीत करण्यात येणार आहे. गोळा केलेले प्लास्टिक  कचरा वेचकांना किंवा व्यावसायिकांना विकण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी प्लास्टिक  संकलीत केल्याचा अहवाल पंचायत समितीस सादर करावा,  असे आवाहन  करण्यात आले आहे.