Sat, Jul 20, 2019 22:06होमपेज › Satara › निघाला ठोसेघरला, पोहोचला ‘कास’वर

निघाला ठोसेघरला, पोहोचला ‘कास’वर

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:11PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या कारभाराची जिल्ह्यात बोंबाबोंब आहे. पर्यटन विकासासाठी फारसे काही न करणार्‍या जिल्हा पर्यटन समितीने सातार्‍यात लावलेल्या चुकीच्या दिशादर्शक फलकांनी मात्र पर्यटकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. महामंडळाच्या या गलथानपणामुळे ठोसेघरचा धबधबा पहायला जाणार्‍या पर्यटकांना कास पठाराची सैर घडत आहे. ‘एमटीडीसी’ने संंबधित चुकीचा फलक तातडीने हटवावा, अशी मागणी नागरिकांसह पर्यटकांकडून होत आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंहामंडळाचे कार्यालय महाबळेश्‍वरमध्ये आहे. त्याठिकाणी कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने हे कार्यालय कसेबसे सुरू आहे. महाबळेश्‍वरामध्ये हवापालटासाठी येणार्‍या सरकारी पाहुण्यांचा प्रोटोकॉल सांभाळण्यापुरतेच या कार्यालयाचे काम आहे की काय? अशी चर्चा त्यामुळे होऊ लागली आहे. जिल्ह्यात विविध पर्यटनांना प्रचंड वाव असतानाही महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ त्यादृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र, जे काही काम या महामंडळाकडून केले जात आहे त्यामध्ये प्रचंड चुका आणि उणीवा असल्याचे निदर्शनास येत आहे.

महाराष्ट्र पर्यटन सातारा जिल्हा पर्यटन समितीद्वारे सातार्‍यातील बोगदा परिसरात लावण्यात आलेल्या चुकीच्या फलकामुळे पर्यटनात विचका पडत आहे. परळी खोर्‍यात असलेला ठोसेघर धबधबा, उरमोडी धरण तसेच सज्जनगड ही ठिकाणे कास पठार परिसराकडे असल्याचे चुकीचे दाखवण्यात  आल्यासारखे भासत आहे. या बोर्डवर एमटीडीसीचा लोगोही आहे. 

सातार्‍यात इतर जिल्ह्यातून, राज्यातून येणार्‍या पर्यटकांसाठी सातारा जिल्हा पर्यटन समितीची ही छोटीशी चूक प्रचंड मनस्ताप देणारी ठरत आहे. नव्या पर्यटकांना संंबंधित ठिकाणाबाबत काहीच माहिती नसल्याने त्यांचे कास पठारापुढे बामणोलीपर्यंत पर्यटन घडत आहे. ‘जाना था जपान और पहॅुंच गए चीन,’ अशी सुध्दा काही पर्यटकांची अवस्था होत आहे.  पर्यटन समितीने लावलेल्या या चुकीच्या बोर्डमुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा बरबाद होत आहे. पर्यटनस्थळाबाबत एमटीडीसीच्या या  गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातार्‍यातील बोगदा परिसरातील चौकात लावलेला संबंधित चुकीचा फलक तात्काळ हटवून बरोबर असलेला दिशादर्शक फलक त्याठिकाणी लावावा. सातारा जिल्हा पर्यटन समिती तसेच एमटीडीसीच्या संंबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पर्यटकांतून होत आहे.